निवडणुकीत 'ईव्हीएम' फोडा : वामन मेश्रामांच्‍या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ | पुढारी

निवडणुकीत 'ईव्हीएम' फोडा : वामन मेश्रामांच्‍या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशीन फोडा. प्रत्येक समाज घटकातील पंधरा- पंधरा लाख कार्यकर्ते तयार करा. ईव्हीएम फोडणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा होईल. मात्र पुढे त्यांना आपण स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देत नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देऊ, असे खळबळजनक विधान भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी येथे केले. त्‍यांच्‍या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

नागपुरातील इंदोरा मैदानावर ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा भांडाफोड’ सभेत बोलताना वामन मेश्राम म्‍हणाले की, ” निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन फोडा, असे आदेश मी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना देत आहे. पोटनिवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून निकाल वेगळा लागतो. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमध्ये घोटाळे होतात.”

आम्ही निवडणूक आयोगाला सुधारणा करण्यासाठी अनेकदा मागणी केली. मात्र, निवडणूक आयोग ऐकत नाही. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनच्या विरोधात भारत बंद आंदोलन पुकारले जाईल.मात्र, ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणेबद्दल निवडणूक आयोगाने ऐकले नाही, तर २०२४ च्या निवडणुकांमध्ये सर्रास ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा वामन मेश्राम यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिला.

२०२४ च्या निवडणुकीत देशभरात १५ लाख मतदान केंद्र असणार आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीन फोडण्यासाठी १५ लाख अनुसूचित जातीचे, पंधरा लाख अनुसूचित जमातीचे, पंधरा लाख भटक्या जमातीचे, पंधरा लाख अल्पसंख्याक समाजाचे तर पंधरा लाख महिला कार्यकर्ते तयार करण्याचे निर्देश मेश्राम यांनी दिले.

ईव्हीएम मशिनद्वारे झालेल्या निवडणुकीत घोटाळे करून काँग्रेसने लोकसभा निवडणूक दोनदा तर भाजपने दोनदा जिंकली. दोनदा निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्याचा आरोपही मेश्राम यांनी केला. विशेष म्हणजे वामन मेश्राम यांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात सुरू केलेली राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार असून. देशातील सर्व राज्यात ७७४ जिल्ह्यातून ते प्रवास करणार आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button