नागपूर : खड्डा चुकविण्याच्या नादात कार उलटून ४ जणांचा मृत्‍यू | पुढारी

नागपूर : खड्डा चुकविण्याच्या नादात कार उलटून ४ जणांचा मृत्‍यू

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : खड्डा चुकविण्याच्या नादात कार उलटून ४ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. नागपूर-अमरावती रोडवरील बाजारगाव जवळ कारला हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली आणि सर्व्हिस रोडवर बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच जणांना उडवित पलटी झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. कार उलटून ४ जणांचा मृत्‍यू झाल्‍याच्या घटनेने शहर हादरून गेले आहे.

मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश

मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचा समावेश आहे. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी येथे घडली आहे.

बंडू नमोराव सालवनकर (५५, सातनवरी), शौर्य सुबोध डोंगरे (९), शिराली सुबोध डोंगरे (६) व चिन्नू विनोद सोनबरसे (१३, सातनवरी) अशी मृतांची नावे आहेत.

या चौघांचाही उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघातात ललिता बाबुलाल सोनबरसे (५०, रा. सातनवरी) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

हे पाचही जण सात सातनवरी येथील बस स्थानकाजवळ बसची प्रतीक्षा करीत उभे होते.

त्यातच अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणारी अनियंत्रित कार खड्डा चुकविण्याच्या नादात सातनवरी येथील बस स्थानकाजवळील दुभाजकावर आदळली व लगेच सर्व्हिस रोडवर उलटली.

सुसाट कारची रोडलगत उभ्या असलेल्या पाच जणांना धडक

तत्पूर्वी या सुसाट कारने रोडलगत उभ्या असलेल्या पाच जणांना जबर धडक दिली.

त्यात पाचही जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाचही जखमींना लगेच नागपूर येथील रूग्‍णालयात नेत असताना यातील चौघांचा वाटेतच मृत्यू झाला.

मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावासह अन्य एका मुलाचा समावेश आहे.

जखमी महिलेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Back to top button