बारामती : लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

बारामती : लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजाराची लाच स्वीकारताना बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संदीपान अभिमान माळी (वय ५६) असे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. एसीबीने शहर पोलिस ठाण्याजवळ रविवारी (दि.३) साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळी हे बारामती शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. या प्रकरणी एका (४२ वर्षीय) तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदारांच्या गुन्ह्याचे चार्जशीट त्यांच्या बाजूने पाठवण्यासाठी माळी यांनी तक्रारदाराकडे ४० हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते.

त्यानुसार रविवारी ३० हजाराची लाच घेताना माळी यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधिक्षक सुरज गुरव, सुहास नागगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलिस उपअधिक्षक सीमा आडनाईक, पोलिस निरीक्षक भारत साळुंके, हवालदार नवनाथ वाळके, भूषण ठाकूर, चंद्रकांत कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिस ठाणे विविध कारणांनी चर्चेत आहे. त्यात अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने रविवारी त्याची शहरात मोठी चर्चा होती. गत आठवड्यातच बारामतीतील वकिल व पोलिस यांच्यात मोठी खडाजंगी झाली होती. त्यानंतर लाचेचे हे प्रकरण समोर आले आहे.

Back to top button