नागपूर : दोन-तीन महिन्यात ‘त्यांनी’ अख्खा महाराष्ट्र बदलला असेल! : देवेंद्र फडणवीस | पुढारी

नागपूर : दोन-तीन महिन्यात ‘त्यांनी’ अख्खा महाराष्ट्र बदलला असेल! : देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अनेकांना चांगले पण पाहवत नाही. काही लोकांना वाटते सारे काही आपल्याच काळातील आहे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र,अडीच वर्षांपैकी सव्वा दोन वर्ष ते बंद दाराआड होते. उर्वरित दोन-तीन महिन्यात त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल तर मला माहिती नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २५) लगावला.

नागपूर येथे विभागीय क्रीडा संकुल येथील सांस्कृतिक कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आणि तो केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. केंद्राने काल (२४) त्याला मंजुरी दिली. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे, त्यामुळे शहराचे नाव बदलले.

लवकरच नगरविकास आणि महसूल विभागाच्या अधिसूचना जारी होतील. त्यानंतर संपूर्ण जिल्हा, तालुका, महापालिका आणि नगरपालिकेचीही नावे बदलतील. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. पण, काही लोकांना वाटते सारे आपल्याच काळातील आहे. कदाचित ते हेही सांगू शकतात की, त्यांनी मोदीजींना फोन केला आणि त्यामुळेच हे नामकरण झाले असा टोला विरोधकांना फडणवीस यांनी मारला.

मविआ सरकारने केला मतदारांचा अपमान

दरम्यान, कसबा आणि चिंचवडमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आहे. यासाठीच आता रडीचा डाव खेळला जात आहे. धंगेकर हे मतदारांचा अपमान करीत आहेत. भाजपा कधीच पैसे वाटत नाही. आमची संस्कृती पैसे वाटण्याची नाही, ती काँग्रेस – राष्ट्रवादीची संस्कृती आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने असले उद्योग केले जात आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा;

Back to top button