

देवळा; पुढारी वृत्तसेवा : उमराणे येथे कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेला तरुणाचा शुक्रवारी रात्री विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची देवळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, उमराणे (ता देवळा) येथे शुक्रवारी (दि २४) रोजी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास येथील शेतकरी व माथाडी कामगार सुनील तुकाराम देवरे (वय ४०) हे आपल्या शेतात उन्हाळी कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (२५)रोजी सकाळी सात वाजता विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला सुनील देवरे यांचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आला. या घटनेमुळे उमराणे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा लहान परिवार आहे. या घटनेची देवळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलीस नाईक व्ही पी सोनवणे करीत आहेत.
शेतकरी रात्री बेरात्री कधिही लाइट आल्यावर अर्धवट झोपेतुन उठून शिवारात थंडी, वारा, रानटी जनावरांच्या हल्याची तमा न बाळगता पिकांना पाणी देण्यासाठी जात असतो, काळ्याकुट्ट अंधारात त्याचा तोल जातो, आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. ही अत्यंत गंभीर बाब आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक शेतकरी संघटना, सातत्याने दिवसा किमान दहा तास सलग लाईट मिळावी म्हणून मागणी करत आहे. प्रशासन अजुन किती शेतकऱ्यांच्या अंताची वाट पहात आहे. हे कळायला मार्ग नाही. कुबेर जाधव ,संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना,देवळा