पुणे: धंगेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा, भाजपची निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार | पुढारी

पुणे: धंगेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा, भाजपची निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आचारसंहितेचा भंग करीत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकार्‍यांकडे केली.

निवडणूक आचारसंहिता लागू असताना धंगेकर हे नियमांचे उल्लंघन करत आहेत. मतदारांना आवाहन करताना जातीयवादी प्रचार केला जात आहे. मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रचार संपलेला असताना कसबा गणपती जवळ जमावबंदीचे नियम मोडून उपोषण करण्यात आले. कुठलाही पुरावा न देता आरोप केले गेले. हे करण्यापूर्वी कुठलीही रीतसर तक्रार केली नाही. हा आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न आहे. आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी जिजामाता शाळा तांबट आळी येथे असलेल्या केंद्रावर एकल नावे असून यामध्ये कुटुंबातील इतर व्यक्तींची नावे नाहीत, हे शंकास्पद वाटते, त्यामुळे त्यांची कसून तपासणी व्हावी. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून अधिकचा बंदोबस्त देण्यात यावा. लोणार आळी तसेच दारूवाला पोलिस चौकी शेजारील मतदान केंद्रावर बोगस मतदान होण्याची शक्यता असल्याने आधार कार्ड, मतदान कार्ड याबाबतची सत्यता कडकपणे तपासली जावी. गुजराती शाळा, सिटी पोस्टमागे या मतदान केंद्राचा परिसर संवेदनशील असल्यामुळे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

Back to top button