ShivSena : ‘प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना संपेल असा प्रयत्न झाला’ | पुढारी

ShivSena : 'प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना संपेल असा प्रयत्न झाला'

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: शिवसेना (ShivSena) ही बंडखोर संघटना आहे, घरातून , कुटुंबातून, पोलिसांकडून आणि इतर प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना (ShivSena) त्या काळात कशी संपेल असा सगळा प्रयत्न झाला असल्याचे आमदार चंद्रकात पाटील यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात म्हटले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात गुरूवारी (दि. ३०) रोजीच्या रात्री ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वांनी पुन्हा सक्रीय होण्याची साद घातली.

मुक्ताईनगर शहरातील जुन्या काळात अतिशय खस्ता खाऊन शिवसेनेची ज्योत कायम तेवत ठेवणार्‍या जेष्ठ शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी काल रात्री ८ वाजेच्या सुमारास पार पडली.

यावेळी जुन्या व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या अडीअडचणी व समस्यांसंदर्भात चर्चा झाली. तसेच आता मागे न थांबता शिवसैनिक व युवा सैनिकांच्या पाठीवर अनुभवाचा हात ठेवून घर तिथे शिवसैनिक राबविण्याची वज्रमुठ आवळण्यात आली.

यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले की, त्या काळात शिवसेनेला वेगळे पडण्याचा प्रयत्न केला गेला. शिवसेना ही बंडखोर संघटना आहे. ज्या लोकांनी शिवसेना उभी केली. खर्‍या अर्थाने त्या लोकांना आज अतिशय नम्रपणे एकत्रित बोलावून त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करण्याचा, हितगुज करण्याचा विचार मनात आला म्हणून आज ही बैठक घेतल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

याप्रसंगी दिवंगत जेष्ठ शिवसैनिक हिरा शेठ राणे, रमेश सापधरे, शांताराम कपले, सुरेश कपले यांची आवर्जून आठवण काढून त्यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला. अशा ज्या लोकांनी शिवसेना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उभी केली वाढविली खस्ता खाल्ल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना केवळ एकलव्याप्रमाणे एक नेता एक गुरू हे ब्रिद ठेवून काम केले. अशा तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा असे म्हणत त्यांनी किमान आठ दिवसातून एकदा तरी शिवसेना कार्यालयात येऊन युवा शिवसैनिकांना तुमचे मार्गदर्शन करावे असे यावेळी ठरविण्यात आले.

अनुभव आणि मायेचा हात प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठीवर ठेवावा तसेच येत्या पुढील काळात घर तेथे शिवसेना व शिवसैनिक हा उद्देश साध्य करण्यासाठी सोबत राहावे असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व जेष्ठ शिवसैनिकांना केले. या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

या प्रसंगी व्यासपीठावर माजी तालुका प्रमुख प्रमोद देशमुख, तालुका प्रमुख छोटू भोई, प्रफुल्ल पाटील, गोपाळ सोनवणे, शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे, प्रशांत टोंगे, सर्व नगरसेवक व शिवसेना व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button