नागपूर : राजभवनच्या सौंदर्यात विद्यार्थ्यांची भर, निसर्ग मेळावा उत्साहात | पुढारी

नागपूर : राजभवनच्या सौंदर्यात विद्यार्थ्यांची भर, निसर्ग मेळावा उत्साहात

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – वनराईने नटलेल्या उपराजधानीतील राजभवनच्या प्रांगणात नुकतेच निसर्ग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात १५ विविध शाळांमधील तब्बल १४८ विद्यार्थ्यांनी निसर्ग मेळाव्यात सहभागी होत कलाप्रतिभेची चुणूक दाखवून दिली. वन रांगोळी, टाइल पेंटिंग, फेस पेंटिंग, कोलाज आणि ग्रुप पेंटिंग या स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी राजभवनच्या सौंदर्यात भर घातली.
उन्नतीगृहातील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. धनंजय पाठक यांनी या स्पर्धेसाठी आपल्या उन्नतीगृहातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले होते. या विद्यार्थ्यांची कलाप्रतिभा बघून सारेच भारावले. राजभवन प्रशासन आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बिएनएचएस) यांच्या संयुक्त विद्यमाने या उक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी ग्रुप पेंटीग स्पर्धेसाठी `राजभवन लँडस्केप` आणि `जैवविविधता` हा विषय होता.

शनिवारी राजभवन प्रांगणात हा अनोखा उपक्रम पार पडला. पर्यावरण व कला यांचा मेळ येथे या निमित्ताने घालण्यात आला. या निसर्ग मेळाव्यामध्ये वन रांगोळी, टाइल पेंटिंग, फेस पेंटिंग, कोलाज आणि ग्रुप पेंटिंग या स्पर्धांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धा प्रकारासाठी वेगळी थीम ठेवण्यात आली होती. कोलाजचा विषय पक्षी आणि कीटक होता. पर्यावरण आणि विकास हा वन रांगोळीचा विषय तर फेस पेंटिंगचा विषय वन्यजीव होता. राजभवनची फुलपाखरे हा टाईल पेंटिंग या स्पर्धेचा विषय होता.

ग्रुप पेंटिंग व कोलाजसाठी माऊंट बोर्ड व टाईल पेंटिंगसाठी टाईल बीएनएचएसतर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते. या अनोख्या स्पर्धेदरम्यान अनेक शाळांमधील विद्यार्थी एकाच छताखाली राजभवनाच्या निसर्गरम्य वातावरणात कला सादर करण्यात दंग झाले. राजभवनचे प्रभारी अधिकारी रमेश येवले यांनी स्पर्धेला भेट देऊन उत्साह वाढवला. बीएनएचएस सहाय्यक संचालक संजय करकरे व संपदा करकरे यांच्या मार्गदर्शनात अमेय परांजपे, चरण शेंडे व महेश मोहर्ले यांनी या मेळाव्याचे आयोजन केले.

Back to top button