नागपूर : कानाला हेडफोन, ट्रेनचे नाही भान, गेला युवतीचा प्राण

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : कानात हेडफोन लावून फिरणे किती जीवघेणे ठरू शकते, याची प्रचिती पुन्हा एकदा नागपुरात आली. हेडफोन कानाला लावून फिरणाऱ्या अभियांत्रिकी प्रथम वर्षाला असलेल्या, एका १९ वर्षीय युवतीला रेल्वेने चिरडले. ही घटना डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगवर घडली.
युवतीचे नाव आरती मदन गुरव (वय 19 वर्षे) असे होते. ती भंडारा जिल्ह्यातील असून शिक्षणासाठी ती हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे तिच्या नातेवाईकाकडे मुक्कामाला होती व डोंगरगावजवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती बुधवारी सकाळी एसटी बसने टाकळघाटवरुन गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ आली आणि ती रेल्वे फाटकाच्या मार्गाने पायीच रेल्वे स्थानकाकडे निघाली होती. मात्र, तिने कानाला हेडफोन लावला होता. यामुळेच रेल्वेमार्ग ओलांडत असताना बाजूने रेल्वेगाडी येत असल्याचे भान तिला राहिले नाही. हा प्रकार काही लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड करून तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण, ती बोलण्यात इतकी तल्लीन होती की वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडीने तिला चिरडले. काही क्षणातच पुणे-नागपूर रेल्वेगाडीखाली आली व घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. धडक बसल्यावर रेल्वेगाडीने तिला किमान पन्नास ते साठ फूट फरफटत नेले. अनेक लोकांच्या समक्ष हा प्रकार घडला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
.हेही वाचा
धक्कादायक! मुलबाळ, आर्थिक सुबत्तेसाठी दिली स्मशानातील राख पिण्यासाठी; हाडांची पावडरही लावली खायला
बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण पत्रिका ठाकरे कुटुंबीयांच्या नावाविना
Mauni Amavasya 2023 : जाणून घ्या, मौनी अमावस्येला शाही स्नानाचे महत्व?