बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण पत्रिका ठाकरे कुटुंबीयांच्या नावाविना | पुढारी

बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण पत्रिका ठाकरे कुटुंबीयांच्या नावाविना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विधानभवनात लावण्यात येणार्‍या तैलचित्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 23 जानेवारी रोजी अनावरण होणार आहे. मात्र, याबाबतच्या निमंत्रण पत्रिकेत ठाकरे कुटुंबीयातील एकाही व्यक्तीचे नाव टाकण्यात आले नाही.

विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. निमंत्रण पत्रिकेत ठाकरे कुटुंबीयांपैकी एकाही व्यक्तीचे नाव नसल्याकडे लक्ष वेधले असता नार्वेकर म्हणाले, समारंभासाठी ठाकरे कुटुंबालाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या उपस्थितीबद्दल आपल्याकडे अद्याप माहिती हाती आली नाही.

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे आमदार असल्यामुळे त्यांना राजशिष्टाचारानुसार निमंत्रणे आहेतच. मात्र, ठाकरे परिवारातील अन्य सदस्यांनाही या कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यात आले आहे. राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले असून, ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा नार्वेकर यांनी व्यक्त केली.

Back to top button