Mauni Amavasya 2023 : जाणून घ्या, मौनी अमावस्येला शाही स्नानाचे महत्व? | पुढारी

Mauni Amavasya 2023 : जाणून घ्या, मौनी अमावस्येला शाही स्नानाचे महत्व?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mauni Amavasya 2023 : नवीन वर्षातील पहिली अमावस्या ही भारतीय हिंदू कालगणनेप्रमाणे माघ महिन्यात येणारी विशेष महत्व असलेली ‘मौनी अमावस्या’ आहे. ही अमावस्या माघ महिन्यात येते म्हणून या अमावस्येला माघी अमावस्या असेही म्हणतात. त्याचप्रमाणे ही अमावस्या यंदा शनिवारी येणार असल्याने हिला शनैश्चरी किंवा शनी अमावस्या असेही संबोधले आहे. आंग्ल कालगणनेनुसार नव वर्षास प्रारंभ झाला आहे. ही अमावस्या शनिवारी 21 जानेवारीला असून या दिवशी शाही स्नान, नदी, सरोवरातील पवित्र स्नान करण्याला फार महत्व आहे.

Mauni Amavasya 2023 : काय आहे मौनी अमावस्येचे महत्व

मौनी अमावस्येला नावाप्रमाणेच या दिवशी मौन पाळण्यास मोठे महत्व आहे. सूर्योदयानंतर नदीत पवित्र स्नान करून गायत्री मंत्राचा जाप करून सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर अमावस्या संपेपर्यंत मौन पाळल्यास त्याचे अनेक आध्यात्मिक लाभ होतात, असे प्राचीन ऋषीमुनींनी सांगितले आहे.

याशिवाय ही अमावस्या हिंदू कालगणने प्रमाणे माघ महिन्यात येते. त्यामुळे हिला माघी अमावस्या असेही म्हणतात. हिंदू कालगणनेप्रमाणे माघ महिना धर्म कार्यांसाठी खूप पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात दान-धर्म करणे, सत्संग करणे आदी गोष्टींना खूप महत्व देण्यात आले आहे. त्यामुळेच माघ महिन्यात येणा-या या अमावस्येचे धार्मिकदृष्ट्या मोठे महत्व आहे. नदीत पवित्र स्नान करून दान-धर्म करायला हवे, असे शास्त्रांनी सांगितले आहे.

Mauni Amavasya 2023 : नदीत पवित्र आणि शाही स्नानाचे महत्व

मौनी अमावस्येला नदीत सरोवरांमध्ये स्नान करणे हे अत्यंत पवित्र तसेच उत्तम मानले गेले आहे. पौराणिक मान्यतेप्रमाणे यादिवशी गंगा नदीसह अन्य पवित्र नद्यांमध्ये वाहत असलेल्या पाण्यात अमृताचे गुण समाहित होतात. त्यामुळे या दिवशी नदी, सरोवरांमधील स्नानाला प्रचंड महत्व आहे. तसेच या दिवशी नदी, सरोवरात केल्या जाणा-या स्नानाला शाही स्नान म्हणूनही संबोधले जाते. या दिवशी नदीत स्नान करण्यासाठी घाटांवर प्रचंड गर्दी झालेली असते.

(वरील माहिती पौराणिक मान्यतेच्या आधारे दिलेली आहे, पुढारी ऑनलाइन त्याची हमी घेत नाही.)

हे ही वाचा :

Cinema Lovers Day : उद्या ‘हे’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये

Aruna Miller | भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांनी रचला इतिहास, भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी शपथ

Back to top button