गडचिरोली : वेडमपल्ली जंगलात पोलीस-नक्षलींमध्‍ये चकमक, शस्त्रसाठा जप्‍त | पुढारी

गडचिरोली : वेडमपल्ली जंगलात पोलीस-नक्षलींमध्‍ये चकमक, शस्त्रसाठा जप्‍त

गडचिरोली पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पेरमिली उपपोलिस ठाण्यांतर्गत येडमपल्ली गावानजीकच्या जंगलात रविवारी (ता.१५) पोलीस आणि नक्षलींमध्‍ये चकमक झाली. पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला. शस्त्रसाठा आणि अन्य साहित्य जप्‍त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी दुपारी अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगलात विशेष अभियान पथकाच्‍या जवानाचे नक्षलविरोधी अभियान सुरु आहे. दरम्यान दबा धरून बसलेल्या सुमारे २० ते २५ नक्षल्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनीही गोळबार करत याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर नक्षल्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. चकमकस्थळी एक पिस्तुल, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आहे. पोलिसांनी ते जप्‍त केले आहे

सध्या नक्षल्यांचा भूमकाल सप्ताह सुरू आहे. यादरम्यान ते मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचा डाव उधळून लावण्यात आल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे. या कामगिरीबद्दल  पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी विशेष अभियान पथकाच्‍या कामगिरीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा

Back to top button