Nashik Makarasankrat : नायलॉन मांजामुळे पक्ष्यांवर संक्रांत, शहरात चार पक्ष्यांचा दुदैवी अंत | पुढारी

Nashik Makarasankrat : नायलॉन मांजामुळे पक्ष्यांवर संक्रांत, शहरात चार पक्ष्यांचा दुदैवी अंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह उपनगरांमध्ये रविवारी (दि.१५) पंतगाबाजी उत्सव अर्थात मकर संक्राती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा सरार्स वापर झाल्याने निष्पाप पाखरांवर ‘संक्रांत’ ओढवली आहे. सायंंकाळी सहा वाजेपर्यंत विविध ठिकाणी नायलॉन मांजामुळे चार पक्ष्यांचा दुदैवी अंत झाला आहे. तर सात पक्षी मांजामुळे गंभीर जखमी झाले असून, त्यांची वनविभागाच्या तात्पुरत्या उपचार केंद्रात देखभाल केली जात आहे.

पतंगोत्सवासाठी आबालवृध्दांकडून नायलॉन मांजाला पसंती दिली जाते. नायलॉन मांजामुळे मानवासह पशु-पक्ष्यांना हानी पोहोचते. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले जाते. मात्र, शहराच्या विविध भागांत पतंग दुकानांमध्ये नायलॉन मांजा सहज उपलब्ध होतो. पंतगबाजही सरार्स याच मांजाचा वापर करत असल्याने वृक्षांसह मोबाइल टॉवर, विद्युत पोल तसेच इमारतींच्या गच्चीवर मांजा अडकून राहतो. हा मांजा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पंतगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर झाल्याने एक घार तर तीन कबुतरांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाच घार, एक शिकरा तसेच १ घुबह गंभीर जखमी झाले आहे. यातील काही पक्ष्यांच्या पंख, पाय, चोचीला दुखापत झाल्याने ते आयुष्यभर जायबंदी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, जखमी पक्ष्यांवर वनविभागाच्या तात्पुरत्या उपाचार केंद्रात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इको-एको फाउंडेशनचे स्वयंसेवक उपाचार करत आहे. त्यामध्ये मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले, अभिजित महाले, अमित लव्हाळे आदींचा समावेश आहे.

पशुवैद्यकीय दवाखाना बंद

रविवारी (दि.१५) शासकीय सुट्टी असल्याने अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद हाेता. त्यामुळे जखमी पक्ष्यांना घेऊन दवाखान्यात येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. त्यांची वनविभागाचे तात्पुरते उपचार केंद्र शोधताना चांगलीच दमछाक झाली. ऐन पंतगोत्सवाच्या दिवशी पशुवैद्यकीय दवाखाना बंद ठेवल्याने सर्वसामान्यांसह वन्यजीवप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा :

Back to top button