Monday motivation : वय वर्षं केवळ सात ! पण लावलेल्या झाडांची संख्या १३ हजाराहून अधिक.. वाचा प्रसिद्धीच्या वेगळ्या प्रवासाबाबत

Monday motivation : वय वर्षं केवळ सात ! पण लावलेल्या झाडांची संख्या १३ हजाराहून अधिक.. वाचा प्रसिद्धीच्या वेगळ्या प्रवासाबाबत

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाच्या सातव्या वर्षी तुमची आमची काय स्वप्नं असू शकतात. एखादं नवं खेळणं मिळावं, आवडता खाऊ खाण्यास मिळावा किंवा भरपूर खेळण्यास मिळावं…. या वयोगटातील बहुतांश मुला-मुलींची हीच स्वप्नं असतात. पण चेन्नईमध्ये राहणारी प्रसिद्धी सिंग मात्र या सगळ्याला अपवाद ठरली आहे. कारण फक्त सात वर्षं वय असलेल्या या मुलीने आजवर १३ हजारांहून अधिक झाडं लावली आहेत. तिच्या या योगदानासाठी आणि पर्यावरणविषयी असलेल्या तळमळीमुळे तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.

प्रसिद्धीचं वृक्षप्रेम जागृत व्हायला एक महत्त्वाची घटना कारणीभूत ठरली. २०१६ मध्ये आलेल्या वर्दा चक्रीवादळाने निसर्गाची आणि झाडांची झालेली अवस्था तिने स्वत:च्या डोळ्याने पाहिली. कुटुंबातच पर्यावरण प्रेमाचं शिक्षण मिळालेल्या प्रसिद्धीला निसर्गाच्या अवस्थेमुळे त्रास झाला. या क्षेत्रात प्रत्येकाच्या योगदानाची गरज तिने वेळीच ओळखली. सुरुवातीला तिच्या मित्र- मैत्रिणींनी या उपक्रमाची थट्टा केली. त्यावेळी तिने लावलेल्या झाडांची फळ पाहून त्यांची पावलं तिच्या उपक्रमाकडे वळली नसती तर नवलच ! आता तिचे हेच मित्र- मैत्रिणीही उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवतात.

तिच्या कामाला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रसिद्धीने फॉरेस्ट फाउंडेशनची स्थापना केली आहे. प्रदूषणमुक्त निसर्ग आणि केमिकलविरहित अन्नधान्य हे तिच्या फाउंडेशनचं मुख्य उद्दिष्ट आहे. आज तिच्यासोबत या फाउंडेशनच्या माध्यमातून दहा हजारांहून अधिक ईको वारियर्स जोडले गेले आहेत. येत्या दोन वर्षात एक लाखाहून अधिक फळझाड लावण्याचा तिचा संकल्प आहे. कोविड दरम्यानही अनेकजण या उपक्रमात सोशल मिडियाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news