चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात माजरी वणी रेल्वे मार्गाच्या 50 मीटर अंतरावर एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला. विद्युत प्रवाहाच्या फेंन्सीग मध्ये मृतदेह असल्याने विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
भद्रावती तालुक्यातील माजरी येथील शेतात वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली होती. वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या ताराला गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेतात मृत वाघीण आढळल्यानंतर स्थानिकांनी याबाबत वनविभागाला दिली. वनपथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
वनविभागाने वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला असून वैद्यकीय अहवाल आल्यावर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या वाघिणीचे काही बछडे आहेत का? याविषयी माहिती घेतली जात आहे. हा अपघात की घातपात, यादृष्टीने देखील तपास केला जात आहे.