महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : शेतकरी अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत | पुढारी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : शेतकरी अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत

पेठ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयेपर्यंतचे प्रोत्साहन लाभ अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पात्र शेतकर्‍यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. विशिष्ट सांकेतिक क्रमांक असलेल्या पात्र शेतकर्‍यांना आधार प्रमाणीकरण करून घेण्यास सांगण्यात आले. 20 ऑक्टोबर 2022 रोजी प्रोत्साहन लाभ योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

परंतु, काही मोजक्याच शेतकर्‍यांना अनुदान मिळाले. प्रतीक्षा क्रमांक एकमधील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. प्रतीक्षा क्रमांक एकमधील उर्वरित शेतकर्‍यांना अनुदान लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शेतकरी सोपानराव नवले व दिलीपराव पवळे यांनी केली आहे. या योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी प्राप्त झालेला विशिष्ट सांकेतिक क्रमांक घेऊन आधार प्रमाणीकरण केले. त्याची स्लिप स्थानिक बँकांमध्ये जमा केली. दिवाळीच्या अगोदर प्रतीक्षा क्रमांक एकमधील शेतकर्‍यांना रक्कम मिळणार, अशी घोषणा सरकारने केली होती. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण होते. परंतु, कमी लोकांच्या खात्यावर रक्कम जमा झाली.

खात्यावर रक्कम जमा नाही
माझ्या कुटुंबातील प्रतीक्षा क्रमांक एकमध्ये नाव येऊनसुद्धा आधार प्रमाणीकरण करूनसुद्धा दिवाळी उलटून चार महिने झाले पण अजून खात्यावर रक्कम जमा झालेली नाही, असे ज्ञानेश्वर माउली एरंडे, गोरक्षनाथ नवले यांनी सांगितले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात आंबेगाव तालुक्यातून 40,874 एकूण खातेधारकांपैकी विशिष्ट सांकेतिक क्रमांक प्राप्त झालेले 18,949 खातेधारक आहेत. त्यापैकी 18,732 शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण करून घेतले. 217 जणांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. आतापर्यंत 7698 शेतकर्‍यांना 26 कोटी 82 लाख रक्कम वितरित करण्यात आली आहे. राहिलेल्या शेतकर्‍यांनासुद्धा लवकरच रक्कम प्राप्त होईल.
                            – पी. एस. रोकडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, मंचर.

 

Back to top button