पारगाव : पुढारी वृत्तसेवा : नागापूर (ता. आंबेगाव) गावात मागील दोन ते तीन दिवसांपासून पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत गावातील सहा जणांना हे कुत्रे चावले आहेत. काही जनावरांनादेखील कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामुळे नागापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात गेले दोन-तीन दिवसांपासून दोन पिसाळलेली कुत्री धुडगूस घालत असून, त्यांनी आतापर्यंत अमृता गभाले (वय 50), कैलास शिवराम पवार, बाळशिराम दिनकर पवार (वय 45), फुलाबाई नारायण पवार, राजेंद्र सीताराम पवार आणि अनुसया पारधी (वय 65) यांना कुत्र्यांनी चावा घेतला.
यापैकी अमृता गभाले, बाळशिराम दिनकर पवार व अनुसया पारधी यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे नागापूर गाव व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सरपंच गणेश यादव म्हणाले, 'स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची कोणतीही दखल घेतलेली नाही. वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी यांना त्वरित या घटनेची माहिती देण्यात आली; परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.'