वाशीम : एटीएममध्ये बिघाड करून बँकांना लाखोंना गंडवणारी टोळी गजाआड | पुढारी

वाशीम : एटीएममध्ये बिघाड करून बँकांना लाखोंना गंडवणारी टोळी गजाआड

वाशीम, पुढारी वृत्तसेवा :  एटीएम मशीनद्वारे व्यवहार करत असतांना मशीनमधून रक्कम वितरणावेळी वितरण व्यवस्थेत बिघाड केला जात होता. यानंतर बाहेर आलेले पैसे घेऊन बँकेचा व्यवहार अयशस्वी दर्शवून बँकेच्या वेगवेगळ्या ATM मशीनद्वारे पैसे काढण्यात येत होते. अशा प्रकारे बँकांना लाखोंचा गंडा घालणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वाशिम यांच्या अकोला, अमरावती, वाशिम, मानोरा व रिसोड येथे असणाऱ्या ATM मशीनमध्ये बिघाड केला जात होता.  त्यामुळे पैसे काढूनसुद्धा बँकेचा व्यवहार अयशस्वी होत आहे, असे भासवून टोळीने तब्बल ७.५५ लाख काढून घेतले. १० वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांशी संलग्न असलेले १९ ATM कार्डद्वारे ७६ वेळा वेगवेगळ्या ATM मशीनमधून व्यवहार करून सदरची रक्कम काढण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.

संबंधित ATM कार्डशी संबंधित असलेल्या मोबाईल क्रमाकांचा तपास केला असता सदर मोबाईल क्रमांक अरविंद कुमार अवस्थी (  रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याचे असल्याचे व त्याने त्याचे नावाचे सीमकार्डने  वेगवेगळ्या  ATM मधून पैसे काढले असल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले. याप्रकरणी वैभव ऋषभदेव पाठक (वय २३) , सत्यम शिवशंकर यादव ( २३ ), सौरव मनोज गुप्ता (२१ ), प्रांजल जयनारायण यादव ( २४ ) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणातील मुख्य आरोपी अरविंद कुमार अवस्थी याच्‍यावर यापूर्वीदेखील गुन्हा दाखल असून, त्याला कानपूर कारागृहातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बँकांच्या ATM मशीनमध्ये असणाऱ्या या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासंदर्भात बँकांना पत्रव्यवहार करण्यात येणार असून नागरिकांनी अश्या प्रकारचे गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा 

Back to top button