बारामती : अजित पवारांच्या दौ-यावेळी पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा | पुढारी

बारामती : अजित पवारांच्या दौ-यावेळी पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गत आठवड्यात बारामतीत त्यांच्याच निवासस्थानासमोर पुतळा जाळण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ७) पवार यांच्या बारामती दौ-यात पोलिसांकडून सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली. येथील व्हीआयआयटीमध्ये पत्रकारांनाही प्रवेशद्वाराबाहेर थांबविण्यात आले. जनता दरबारासाठी जाणा-या नागरिकांची कसून तपासणी करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचे विधान केले. त्यामुळे राज्यात त्यांच्या विरोधात भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व अन्य काही संघटनांकडून आंदोलने करण्यात आली.

गत आठवड्यात बारामतीत आंदोलन पार पडले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांना गुंगारा देत थेट पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानाबाहेरील प्रवेशद्वाराजवळ पुतळा जाळला. त्यामुळे बारामती दौ-यावर आलेल्या पवार यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. विद्या प्रतिष्ठानच्या व्हीआयआयटीच्या प्रवेशद्वारावरच पत्रकारांना थांबविण्यात आले. तसेच पवार यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात त्यांना मागण्यांची निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांची कसून तपासणी करूनच त्यांना आत प्रवेश देण्यात आला.

पोलिसांनाच विचारा
माझ्या बंदोबस्तात का वाढ केली हे मलाही माहिती नाही. यासंबंधी तुम्ही पोलिसांनाच विचारा, असे अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कदाचित तुम्ही माझ्यावर हल्ला कराल म्हणून बंदोबस्त वाढवला असेल अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. मी बारामतीचा. बारामती माझी. त्यामुळे मी येणार, लोकांच्यात मिसळणार. काम करणार. पोलिसांना एखादा मेसेज मिळाला असेल त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने त्यांनी खबरदारी घेतली असेल असे अजित पवार म्हणाले.

Back to top button