महाविकास आघाडीचे बॉम्ब लवंगी फटाकेही नाहीत : देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी ऑनलाईन : आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत, फक्त पेटवायचा अवकाश, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सोमवारी दिला होता. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधक बॉम्ब म्हणत आहेत, पण ते लवंगी फटाके देखील नाहीत. आमच्याकडे भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू. पण आता विरोधकांचे लवंगी फटाके काय आहेत ते बघू, असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालय येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, आज विधीमंडळात सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडतील आणि एकमताने मंजूर होईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काहीच केले नाही. सीमाप्रश्न आमचे सरकार आल्यानंतर झाला नाही. सीमाप्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आहे. वर्षांनुवर्षे ज्यांचे सरकार आहे ते आता आमचे सरकार आल्यानंतरच सीमाप्रश्न निर्माण झाला, असे भासवत आहेत. अशा प्रकारचे सीमाप्रश्नावर कधीच राजकारण झाले नाही. विरोधी पक्षात असताना सरकारच्या पाठीशी उभे राहीलो. सीमाप्रश्नावर राजकारण करू नये, असे ते म्हणाले.
कर्नाटकव्याप्त सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले, मागणी करण्याकरीता कोणी काहीही करू शकतो, पण इतक्या वर्षात का झाला नाही याच उत्तर द्यावे. विरोधक बॉम्ब म्हणत आहेत ते लवंगी फटाकेदेखील नाहीत. आमच्याकडे भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू, पण आता विरोधकांचे लवंगी फटाके काय आहेत ते बघू, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :