

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची आर्थिक मदत आता एक लाख रुपये करण्यात येणार आहे. यापूर्वी ही मदत 30 हजार रुपये होती. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. या प्रस्तावित योजनेत एक हजार रुग्णालयांचा समावेश होता. आता ही संख्या वाढवून 1100 करण्यात येणार आहे.
भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी 100 नंबर अॅम्बुलन्सच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रत्येक शंभर किलोमीटर अंतरावर ही अॅम्बुलन्स उभी राहील. तसेच या सेवेचे फॉरेन्सिक ऑडिट करून दोष आढळल्यास नवीन कंत्राटदार दिला जाईल. एकालाच कंत्राट न देता विभागीय कंत्राट नियुक्तीचाही राज्य सरकार विचार करेल, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. दर तीन वर्षांनी लोकसंख्येचे निकष बदलत असल्यामुळे राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही डॉ. सावंत यांनी दिली.
भाजपचे सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत मोहिते-पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बर्याच वेळा पत्र व्यवहार केला आहे. मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची घोषणाही डॉ. सावंत यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी पदभरती, मशिनरी, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आरोग्य विभागामध्ये रिकाम्या जागा असल्याबाबत उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे. शिवाय महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या दरात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सचिवांची समिती नेमून अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सावंत म्हणाले.
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन 40 रुपयांवरून 500 रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. लोढा म्हणाले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सन 1982 पासून 40 रुपये आहे. यात वाढ करून पाचशे रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही विभागाच्या स्तरावर सुरू आहे. खासगीच्या तुलनेत शासकीय आयटीआयचे प्रवेश शुल्क कमी आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.