विधानभवनातून : विरोधकांच्या निशाण्यावर शिंदे गट! | पुढारी

विधानभवनातून : विरोधकांच्या निशाण्यावर शिंदे गट!

दिलीप सपाटे : पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कथित भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला असताना दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही विरोधकांनी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जमीन घोटाळ्याने करीत कामकाज बंद पाडले. त्यामुळे या अधिवेशनात विरोधकांच्या निशाण्यावर शिंदे गटच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः नागपुरात आले होते. दुसऱ्या आठवड्यातही त्यांच्याच उपस्थितीत सत्तार यांच्यावर विरोधकांनी हल्ला चढविला. त्यानंतर आमच्याकडे असे अनेक बॉम्ब आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. एनआयटी जमीन घोटाळ्याच्या आरोपातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहीसलामत सुटले असेल तरी आता सत्तार यांचे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर दीडशे कोटीच्या गायरान जमीन घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत बोलताना त्यांची पाठराखणच केली आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने न्यायालयाने सत्तार यांचा ३७ एकर गायरान जमीन वाटपाचा आदेश रद्द करत त्यांच्याविरुद्ध कडक ताशेरे ओढल्यामुळे हे प्रकरण वाटते तेवढे सोपे राहिलेले नाही. एकनाथ शिंदे यांना न्यायालयाने क्लीन चिट दिल्यामुळे ते आरोपातून सुटले. पण, सत्तार यांचा निर्णय न्यायालयानेच चुकीचा ठरविला आहे.

सत्तार हे कायम वादग्रस्त मंत्री राहिले आहेत. टीईटी घोटाळ्यात त्यांच्या मुलांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, त्यातून ते बचावले. या आरोपानंतरही त्यांना शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळात मंत्री केले. आपल्या वादग्रस्त विधानांनी सत्तार हे कायम चर्चेत असतात. त्यातून त्यांना कायमच नशिबाने साथ दिली आहे. पण यावेळी प्रसंग बाका आहे. ते विरोधकांच्या आरोपावर कोणता खुलासा करतात याबाबत आता उत्सुकता आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ५० आमदारांच्या मतदारसंघात शिंदे आणि भाजपनेही सर्व्हे केल्याची माहिती आहे. त्यात जे २२ आमदार निवडून येऊ शकतात, त्यात सत्तार यांचा नंबर वरचा आहे. त्यामुळे सत्तार अडचणीत आलेले शिंदे यांना परवडणारे नाही. मंगळवारी या मुद्द्यावर विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. या विषयाव शिंदे कशी बॅटिंग करतात याबाबतही उत्सुकता आहे. सत्तार यांचा बचाव करताना शिंदे यांचीही कसोटी लागणार आहे.

विरोधकांच्या निशाण्यावर प्रामुख्याने शिंदे गटच आहे. त्यात सत्तार हे नाव प्रमुख आहे. त्यांची आणखी काही प्रकरणे विरोधकांच्या हाती असल्याचे समजते. विरोधक भाजपशी थेट पंगा घेण्यास सध्यातरी तयार नाहीत. अशावेळी शिंदे गटाचे मंत्रीच सॉफ्ट टार्गेट ठरतील अशी स्थिती आहे. त्यातच शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार आपली कामे उरकून घेण्यासाठी सतत मुख्यमंत्र्यांना गराडा घालत आहेत. या गोंधळात होणाऱ्या चुकांवरही विरोधकांचे लक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना अधिक काळजी घ्यावी लागेल, असेच संकेत आहेत.

Back to top button