चंद्रपूर : पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार | पुढारी

चंद्रपूर : पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

चंद्रपूर ; पुढारी वृत्‍तसेवा : पट्टेदार वाघाच्या हल्‍ल्‍यात गुराखी ठार झाल्‍याची घटना घडली आहे. जंगलात चरण्यासाठी जनावरे घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. ही घटना (रविवार) सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर बिटातील खांडला परिसरात घडली. अनिल पांडूरंग सोनुले (वय ३६) रा . खांडला असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पट्टेदार वाघाच्या हल्‍ल्‍यात गुराखी ठार झाल्‍याचे वृत्‍ताने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिंदेवाही तालुक्यात गावात वाघाची दहशत असल्याने गुराख्यांनी गुरे राखणे बंद केले आहे. गुरांचा चराईचा प्रश्न निर्माण झाल्याने गावातील काही इसम आळी पाळीने गुरे चराईसाठी जंगलात नेत आहेत. रविवारी गुरे चराईसाठी अनिल सहका-यांसह पळसगाव वनपरिक्षेत्रातील पिपर्डा बिटात गावालगतच्या जंगलात गेला होता.

दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जनावरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अनिल सोनुले यांच्यावर हल्ला करून त्‍यांना फरफटत नेले. त्याच्यासोबत असलेला सहकारी गजानन कुंभरे यांने ही घटना बघितली. त्यामुळे त्याने आरडाआओरड सुरू केला. मात्र वाघाच्या तावडीतून त्याला वाचविता आले नाही. काही वेळात वाघाच्या हल्ल्यात तो ठार झाला.

सदर घटनेची माहिती पळसगाव वन विभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. सिंन्देवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांनाही माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी उपस्थित झाले.

पचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. अनिल पांडूरंग सोनुले यांच्या पश्चात आई , पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याने खांडला गावात शोककळा पसरली आहे.

सदर घटनेने नागरीकात दहशत निर्माण झाली असून, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

पहा व्हिडिओ : मुंबईत पुन्हा साचले पाणी आणि त्यात विराजमान बाप्पा

Back to top button