सोमय्या यांना स्थानबद्ध का केले? निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशीची मागणी | पुढारी

सोमय्या यांना स्थानबद्ध का केले? निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशीची मागणी

मुंबई, पुढारी ऑनलाईन: भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबईत स्थानबद्ध करण्याच्या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधिशामार्फत करावी, अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

कागलचे आमदार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कथित भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सोमय्या हे कागलमध्ये येणार होते.

कागल पोलिस ठाण्यात येऊन ते मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देणार होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

त्यांनी रविवारी रात्रीपासून रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यास सुरूवात केली होती.

त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सोमय्या यांना स्थानबद्ध करत कराड येथेच रेल्वेतून उतरवण्यात आले होते.

राज्यात तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य अराजकतेकडे जात आहे.

त्यामुळे पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी वर्ग आणि सामान्य नागरिकांनी आता बोलले पाहिजे, असेही ते म्हणाले.

विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमचे काम करीत आहोत. पण सामन्यांनीदेखील आता आवाज उठवणे गरजेचे असल्याचे शेलार म्हणाले.

शेलार म्हणाले, ‘सोमय्या यांच्या स्थानबद्धतेबाबत कोणाला काहीही माहिती नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले गेल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले.

याविरोधात सोमय्या पोलिस ठाण्यात तक्रार करायला जात होते, मात्र त्यांना रोखण्यात आल्याचे सांगत रोखताना जे कारण देण्यात आले ते संशयास्पद होते.’

गुन्हेगार माहीत असूनही कारवाई करता?

ते पुढे म्हणाले, ‘गुन्हेगार कोण हे माहिती असताना, तसेच कायदा आणि सुव्यवस्था कोण हाती घेईल हे देखील सरकारला माहीत हाोते.

तसेच तो कुठल्या पक्षाचा हेही माहिती असताना तुम्ही कारवाई कुणावर करता आणि अटकाव कुणाला करताय?

एकप्रकारे सरकारी यंत्रणेनेच हा गुन्हा केला आहे. शिवसेनेचे नेते सांगतात, याबाबत मुख्यमंत्र्यांना काही माहिती नव्हती.

यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसत आहे. हे लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करावी.’

हेही वाचा : 

Back to top button