३२ प्रकारच्या सोलापुरी टॉवेल चा विदेशात ‘भाव’ | पुढारी

३२ प्रकारच्या सोलापुरी टॉवेल चा विदेशात ‘भाव’

सोलापूर ; जगन्नाथ हुक्केरी : वस्त्रोद्योगातील चादरीसह विविध उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरी टॉवेलही जगप्रसिद्ध आहेत. टॉवेल म्हटले की, मोठा टॉवेल आणि नॅपकीन असे आपल्याला वाटते; पण टॉवेलचे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 32 हून अधिक प्रकार आहेत. सध्या हे टॉवेल विदेशात ‘भाव’ खात आहेत.

बदलत्या काळाबरोबरच नव्याचा ध्यास घेत सोलापूरच्या वस्त्रोेद्योगाने आपल्या उत्पादनात अनेक बदल घडविले. यात नवनवीन उत्पादनांसह आकर्षक निर्मिती, नक्षीकाम, कला-कौशल्यांसह ग्राहकांना आकर्षण निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग केले.

यामुळे सोलापुरी चादरीसह टॉवेल, बेडसीट, कपडे व अन्य उत्पादनांना देशी बाजारपेठांबरोबरच बाहेरच्या देशांतील बाजारपेठांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. येथील टॉवेलच्या उत्पादनांना दिल्ली, कोलकाता, मुंबई येथील बाजारपेठांत मोठी मागणी आहे. युरोप, अमेरिका, कॅनडा, अरब राष्ट्रे, आफ्रिका या देशांतील बाजारपेठांत सोलापुरी टॉवेल सध्या मोठ्या प्रमाणात भाव खात आहे.

कोरोना महामारीमुळे निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. सध्या वाहतूक व्यवस्था व नियमांमध्ये शिथिलता आल्याने निर्यातीची दारे मोठ्या प्रमाणात खुली झाली आहेत. याचा फायदा सोलापूरच्या टॉवेल उत्पादकांना होत आहे. सगळ्याच प्रकारच्या टॉवेलना विदेशातून मागणी असताना मात्र कोरोनामुळे पर्यटनावर निर्बंध असल्याने बीच टॉवेलच्या मागणीत मात्र कमालीची घट झाली आहे. बाजारपेठेतील बदल आणि मागणीचा विचार करुन उत्पादकही आपल्या उत्पादनामध्ये बदल घडवून आणत आहेत. मागणी असलेल्या टॉवेलचे उत्पादन घेत आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने दर्जेदार उत्पादनही होत आहे. कारखानदारांची मुलेही या क्षेत्रात नव्या ताकदीने एंट्री करत असल्याने सोलापुरी उत्पादनांची क्षमता वाढत आहे. कारखानदारांच्या नव्या पिढीकडून होत असलेल्या नवनिर्मितीच्या प्रयत्नाकडे जागतिक बाजारपेठांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या कारणांमुळे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला सध्या चांगले दिवस येत असल्याने उत्पादकांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

पूर्वी कारखानदारांची मुले या व्यवसायापासून दूर जात होती. आता यात रस दाखवत नवी निर्मिती करत आहेत. विविध 32 प्रकारच्या टॉवेलना जागतिक बाजारपेठेत पसंती मिळत आहे. यामुळे निर्यातीमध्ये वाढ होत आहे. सध्या सोलापूरच्या अर्थकारणासाठी वस्त्रोद्योग बळ देत आहे.
– अशोक संगा, निर्यातदार, सोलापूर

Back to top button