भंडारा: नदीकाठावरच झाली महिलेची प्रसुती, बाळ-बाळंतिण सुखरुप | पुढारी

भंडारा: नदीकाठावरच झाली महिलेची प्रसुती, बाळ-बाळंतिण सुखरुप

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : चहुबाजुंनी गावाला पाण्याचा वेढा. प्रवासासाठी फक्त नावेचा आधार. अशा परिस्थितीत प्रसुतीकळा आलेल्या महिलेला नदीकाठापर्यंत आणण्यात आले. परंतु, वेळेवर नावाडी नाव घेऊन आलाच नाही. त्यामुळे नदीकाठावरच सदर महिलेची प्रसुती झाली.

बेटाचे स्वरुप असलेल्या लाखांदूर तालुक्यातील आवळी या गावी बुधवारी ही घटना घडली. वृंदा रविंद्र दिघोरे (वय ३३, रा. आवळी) असे महिलेचे नाव आहे.

आवळी या गावाला वैनगंगा व चुलबंद या दोन नद्यांनी चहूबाजूंनी वेढलेले आहे. या गावाला जाण्यासाठी पूल नसल्यामुळे वर्षातील सात महिने येथील विद्यार्थी, महिला व पुरूष नावेने जिवघेणा प्रवास करीत असतात.

आजपर्यंत आलेल्या सर्वच पुरांचा फटका या गावाला बसला आहे. सन २००४ मध्ये आलेल्या पुरात येथील ग्रामस्थांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने स्थलांतरीत करण्यात आले होते.

सोनी लगत असलेल्या या गावाचे इंदोरा या गावात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र आवळी गावाच्या मातीत रूजलेल्या आठवणीतून येथील ग्रामस्थ आवळी गाव सोडण्यास तयार नाहीत.

गतवर्षी आलेल्या पुराचा देखील फटका आवळी या बसला असता, जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी मोटारसायकलने आवळी बेट या गावाला भेट देऊन पुनर्वसीत गावी जाण्याची विनंती केली होती.

शासन, प्रशासनाकडून आवळीवासियांना स्थलांरीत होण्याचे नोटीस प्राप्त झाले होते. मात्र आवळीवासी गाव सोडण्यास तयार नसून, स्वत:च्याच जिवाशी खेळतांना दिसत आहेत.

दरम्यान, एक आठवड्यापासून येत असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथळी भरून वाहत आहेत. शासन व प्रशासनाकडून देखील सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.

अशातच बुधवारी पहाटे आवळी या गावातील वृंदा रविंद्र दिघोरे नामक महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. तिने ही बाब आपल्या पतीस दिली असता, त्याने शेजा-यांना व गावातील आशा सेविकेस माहिती दिली.

गावात रूग्णवाहिका येऊ शकत नसल्यामुळे सोनी-आवळी दरम्यान असलेल्या चुलबंद नदीपर्यंत ते पोहोचले. चुलबंद नदीघाटावर गेल्यानंतर सोनी गावाकडे नाव असल्यामुळे त्यांनी सोनी येथील नावाड्याशी फोन करुन संपर्क साधला.

मात्र, नावाडी गाढ झोपेत असल्यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशातच महिलेच्या वेदना अधिकच वाढत चालल्या होत्या. नदी पार करण्यासाठी नावाडी व दवाखान्यात जाण्यासाठी रूग्णवाहिका येऊ शकत नसल्यामुळे वृंदासह तिचे संपूर्ण कुटूंब घाबरले होते.

अखेरीस नदीकाठावरच वृंदाची प्रसुती झाली. वृंदाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. वृंदा व तिचे बाळ पूर्णत: सुरक्षित असून त्यांना लाखांदूरच्या ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Back to top button