Bharat Jodo Yatra : सावरकरांबद्दल काँग्रेस, शिवसेनेची मते वेगळी; ‘मविआ’वर परिणाम नाही : जयराम रमेश | पुढारी

Bharat Jodo Yatra : सावरकरांबद्दल काँग्रेस, शिवसेनेची मते वेगळी; ‘मविआ’वर परिणाम नाही : जयराम रमेश

शेगाव(बुलढाणा); पुढारी वृत्तसेवा : भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातील जनतेने मोठा प्रतिसाद दिल्याने काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटीशांसमोर झुकले नाहीत हे सांगताना त्यांची तुलना सावरकरांशी केली होती. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत. त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

आज (दि.१८) शुक्रवार दुपारी शेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, सावरकरांच्या मुद्यावरुन महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकरांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोड़ो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही.

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जाओच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे.

भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही. भारत जोडो यात्रेत उद्या (दि.१९) इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असणार आहे. महिलांचा राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी घेतला होता. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेले आहे. उद्या नारीशक्तीचे भव्य दर्शन भारत जोडो यात्रेत दिसेल असे जयराम रमेश यांनी सांगितले.

हेही वाचा; 

Back to top button