पाथर्डी : पोलिस नाईक बनला मोबाईल चोरांचा कर्दनकाळ ! | पुढारी

पाथर्डी : पोलिस नाईक बनला मोबाईल चोरांचा कर्दनकाळ !

अमोल कांकरिया : 

पाथर्डी तालुका : ‘तुमचा मोबाईल चोरी गेला आहे का?..मोबाईल हरवला का? घाबरू नका, तुमचा मोबाईल शोधून देतो..नवीन घेऊ नका आठ दिवसांत तुमच्या मोबाईलचा शोध लावला जाईल, असे शब्द कानावर पडतात, तेव्हा मोबाईलधारकाला अपोआपच धीर येतो. चोरी किंवा हरवलेला मोबाईल शोधून त्यांना परत देण्याचे काम पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राम सोनवणे यांनी अखंडपणे करत आहेत. पोलिस नाईक सोनवणेंनी आजपर्यंत विविध ठिकाणी कर्तव्य बजावत सुमारे 600 मोबाईलचा शोध लावून लोकांना परत मिळवूून दिले आहेत. या कामामुळे पोलिस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून राम सोनवणे यांचा परिचय प्रामाणिक कार्यातून झाला आहे. त्यांनी आत्तापर्यंत जिल्ह्यातील ज्या-ज्या पोलिस ठाण्यात काम केले, त्या ठिकाणी त्यांनी मोबाईलचा शोध लावून सुमारे 94 लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आहे.

मोबाईल शोधून देणारा पोलिस अशी त्यांची ओळख झाली आहे. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मोबाईल अत्यंत महत्त्वाचा घटक बनला. यामुळे अनेक गोष्टी माणसाला सोप्या झाल्या आहेत. संपर्काचे सर्वात मोठे साधन मोबाईल बनला आहे. पोलिस नाईक राम सोनवणे पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असल्यापासून त्यांनी तांत्रिक पद्धतीने तपास लावून 92 व्यक्तींचे मोबाईल शोधून त्यांना परत केले आहेत. मोबाईल शोधण्या व्यतिरिक्त सोनवणे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांचे क्राइम रायटर असून, गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्याचे कामकाज करतात. मोबाईल चोरी गेलेल्या व्यक्तींना आपला मोबाईल परत मिळालेल्याने त्याच्या चेहर्‍यावरती वेगळाच आनंद पहावयास मिळतो. त्यामुळे सोनवणेंची मोबाईल शोधून देणारा पोलिस अशी ओळख झाली आहे.

पोलिस नाईक राम सोनवणे पाथर्डी पोलिस ठाण्याला आल्यापासून आजपर्यंत 114 मोबाईल हस्तगत केले असून, ते मुळ मालकांकडे देण्यात आले आहेत. साडे आठ हजारापासून ते एक लाख पाच हजारांपर्यंतचे विविध कंपन्यांच्या मोबाईलचा त्यामध्ये समावेश आहे.

वर्षभरात 50 टक्के मोबाईलचा शोध

वर्षभरात पाथर्डी पोलिस ठाणे हद्दीमधील हरवलेले अथवा चोरी गेलेले मोबाईलपैकी 50 टक्के मोबाईल आत्तापर्यंत शोधून परत केले आहेत. यापूर्वी अशी कामगिरी झाली नव्हती. प्रत्येक पोलिस ठाण्यात सोनवणेंसारखे कर्मचार्‍यांनी मोबाईल शोधण्यास वेळ दिला, तर मोबाईल चोरीचे गुन्हे घडण्याची प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल; तर हरवलेल्या मोबाईल त्या व्यक्तीला दिल्याचे समाधान लाभेल.

Back to top button