गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात खिळखिळी झालेली नक्षल चळवळ बळकट करण्याच्या हेतूने रेकी करण्यासाठी आलेल्या दोन जहाल नक्षल्यांना पोलिसांनी धानोरा तालुक्यातील मोरचूल परिसरातून अटक केली. सनिराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा शामलाल नरोटे (वय २४) आणि समुराम उर्फ सूर्या घसेन नरोटे (वय २२) (दोघेही रा. मोरचूल) अशी अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.
सनिराम नरोटे हा २०१५ मध्ये टिपागड दलमध्ये भरती झाला. त्यानंतर नक्षल नेता जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून त्याने काम केले. पुढे २०२० पर्यंत तो नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत होता. शासनाने त्याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. समुराम नरोटे हा नक्षल्यांच्या जनमिलिशियाचा सदस्य होता. त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते. दोन्ही नक्षल्यांवर खून, जाळपोळ, चकमक असे अनेक गुन्हे दाखल होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऑक्टोबर २०२० पासून आतापर्यंत २० नक्षल्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सद्य:स्थितीत उत्तर गडचिरोलीत नक्षल चळवळ संपुष्टात आली आहे. टिपागड आणि चातगाव दलम जवळपास संपलेले आहेत. त्याअनुषंगाने अबुझमाडमधील नक्षल्यांच्या नेत्यांनी अटकेतील दोन्ही नेत्यांसह काही जणांना रेकी करण्यासाठी उत्तर गडचिरोलीत पाठविले होते. या भागात नक्षल चळवळ बळकट करण्यासाठी वाव आहे काय, लोकांचा प्रतिसाद कसा मिळू शकतो. याविषयी ते पडताळणी करीत होते. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली, असेही पोलिस अधीक्षक गोयल यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक सर्वश्री सोमय मुंडे, समीर शेख, अनुज तारे उपस्थित होते.
हेही वाचा :