गाम्बियात ६६ बालकांचा बळी घेणारी औषध कंपनी भारतात आहे ब्लॅक लिस्टमध्ये | पुढारी

गाम्बियात ६६ बालकांचा बळी घेणारी औषध कंपनी भारतात आहे ब्लॅक लिस्टमध्ये

पुढारी ऑनलाइन डेस्क : गाम्बियामध्ये खोकल्याच्या औषधातून 66 मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर सगळीकडे कफ सिरपबाबत एकच खळबळ उडाली आहे. भारतात सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) लोकांना खात्री दिली आहे की, गाम्बियात ज्या कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाला आहे ते औषध भारतात स्थानिक पातळीवर विकले जात नाही. मात्र, तीच मेडेन फार्मास्युटिकल्स कंपनी भारतात वारंवार गुन्हेगार ठरली आहे. या कंपनीकडून देशात निकृष्ट दर्जाची औषधे उत्पादित केली गेली आहे. 2011 मध्ये या कंपनीला बिहारमध्ये काळ्या यादीत टाकण्यात आले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 1990 मध्ये मेडेन फार्मास्युटिकल्सची स्थापना झाली. हरियाणातील कुंडली आणि पानिपत आणि हिमाचल प्रदेशातील सोलन येथे या कंपनीची उत्पादन युनिट्स आहेत, कॉर्पोरेट कार्यालय पीतमपुरा, दिल्ली येथे आहे. मेडेन फार्मास्युटिकल्स ही 2014 मध्ये 39 भारतीय औषध कंपन्यांपैकी एक होती जिला व्हिएतनाममध्ये काळ्या यादीत टाकण्यात आले होते.

2015 मध्ये, त्याचे उत्पादन गुजरातमध्ये निकृष्ट असल्याचे आढळून आले आणि 2017 मध्ये केरळमध्ये कंपनीला दंड करण्यात आला. तथापि, याने राज्यात औषधांचा पुरवठा सुरूच ठेवला, कारण केरळमध्ये 2021 आणि 2022 मध्ये त्याची उत्पादने कमीत कमी पाच वेळा कमी दर्जाची आढळली हे यावरून स्पष्ट होते.

कफ सिरपच्या औषधामधील डायथिलीन ग्लायकॉल (डीईजी) आणि इथिलीन ग्लायकोलच्या “अस्वीकार्य” प्रमाणात आहे, ज्यामुळे गाम्बियामध्ये मुलांचा मृत्यू झाला असे म्हटले जाते. त्याच डीईजीमुळे जानेवारी 2020 मध्ये जम्मूमध्येही मुलांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेत हिमाचल प्रदेशातील मेसर्स डिजिटल व्हिजन या वेगळ्या कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपमध्ये हे डीआयजी आढळून आले. मात्र, सीडीएससीओनेदेखील या वस्तुस्थितीवर मौन बाळगले आहे.

ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट 1940 नुसार, बनावट ड्रग्ज तयार करणे किंवा त्याचा व्यापार करणे ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो अशा गुन्ह्यांच्या शिक्षेमध्ये 10 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत आणि 10 लाख रुपयांचा दंड किंवा जप्त केलेल्या औषधाच्या तिप्पट किंमतीचा समावेश असू शकतो. आजपर्यंत डिजिटल व्हिजनमधून कोणालाही दंड करण्यात आलेला नाही आणि सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत.

भारतात कफ सिरपच्या औषधातील डीईजी घटकामुळे होणारे मृत्यू नवीन नाहीत. 2020 मध्ये जम्मूमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 12 मुलांव्यतिरिक्त, 1998 मध्ये दिल्लीत 33 मृत्यू, 1986 मध्ये मुंबईत 14 आणि 1973 मध्ये चेन्नईमध्ये 14 मृत्यू झाले. तथापि, सीडीएससीओने असे म्हटले आहे की “WHO ने अद्याप CDSCO ला मृत्यूचा संबंध प्रस्थापित केलेला नाही. भारतात काही औषधांमध्ये फक्त 0.1% ते 2% इतकाच डीईजीचा वापर सॉल्व्हेंट म्हणून केला जातो आणि ही पातळी खूपच कमी आहे.

Back to top button