दानोळी (कोल्हापूर ); पुढारी वृत्तसेवा : पूरग्रस्तांनो मिळालेल्या शासकीय मदतीतील वाटा कोणालाही देऊ नका. ते पैसे तुमच्या हक्काचे पैसे आहेत. कोणी मागितले तर आमच्याशी संपर्क करा. असा बॅनर कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी या गावात लावल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांची गोची झाली आहे.
गेल्या महिन्यात आलेल्या महापुरात येथील अनेकांचे नुकसान झाले आहे. स्थलांतर झालेली अकराशे कुटुंब आहेत. प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये मदत मिळाली आहे.
त्यामुळे काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या टक्केवारीची वसुली सुरु केल्याने सत्ताधारी नागरिक संघटनेने हा बॅनर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावला आहे. या बॅनरमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी नागरिक संघटनेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील अरुण भोसले या तरुणाला २०१९ च्या महापुरात घर पडुनसुद्धा पैसे मिळाले नाहीत. या बद्दल सोशल मीडिया आणि वृत्त पत्रातून आवाज उठत आहे. पण तहसिलदार आणि गटविकास अधिकारी गांधारीची भूमिका घेत असल्याने सगळे मिळून खाऊ या वृत्तीवर 'अंकुश' कोण ठेवणार या बद्दल उलट सुलट चर्चा रंगली आहे.