उद्धव ठाकरेंनी अहंकारामुळेच कांजूर मार्ग धरून ठेवला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

उद्धव ठाकरेंनी अहंकारामुळेच कांजूर मार्ग धरून ठेवला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील मेट्रो कार शेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे २९ टक्के काम पूर्ण झाले असून एकूण प्रकल्पातील ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच त्यांनी फक्त इगो करता कांजूर मार्ग धरून ठेवला होता, असा आरोपही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. नागपूर येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरून वाद धुमसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मूळात आरेमध्ये एकही झाड कापायचे नसताना कांजूरचा आग्रह धरण्याचं कारणच नव्हतं. आरेतील काम बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. असं असतानाही केवळ इगोसाठीच कांजूरचा आग्रह धरण्यात आला होता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आरे कॉलनीत कारशेडसाठी एकही झाड कापणार नसल्याचा दावाही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
यापूर्वीही फडणवीस यांनी ठाकरेंवर कांजूर मार्गचा निर्णय अहंकारातून घेतल्याची टीका केली होती.

राज्याचे मंत्रीमंडळ तर झाले मात्र अद्याप खातेवाटप झाले नाही, याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, खातेवाटप लवकरच होईल. काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्याचा वाद असल्याने ते प्रकरण हायकोर्टात सुरू आहे. मेट्रो कारशेडची जागा मेट्रो थ्री करिता मागितलेली आहे. तर कांजूर मार्गची जागा मेट्रो सिक्ससाठी मागितली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो थ्रीसाठी योग्य नाही, हे आमच्या काळातल्या कमिटीने तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या हाय लेवल कमिटीनेही अहवालात स्पष्ट केलं आहे.

कार शेड आरेमध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्गमध्ये नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षाचा उशीर होईल, असं ठाकरे यांनी नेमलेल्या समितीनेचं म्हटल्याचं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मला असं वाटतंय की त्यांनी फक्त इगो करता कांजूर मार्ग धरून ठेवला. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील पैसे आहेत आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

      हेही वाचलंत का?

Back to top button