पुण्याचे पालकमंत्री फडणवीस की पाटील? | पुढारी

पुण्याचे पालकमंत्री फडणवीस की पाटील?

पुणे : पुढारी वृत्तसेवा पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाती घेणार की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात येणार, याबाबत कार्यकर्त्यांत चर्चा रंगू लागली आहे. या दोन्ही महापालिकांवर गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी भाजपची मुख्य लढत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करीत या दोन्ही महापालिका पुन्हा जिंकण्याच्या उद्देशाने धोरणात्मक व्यूहरचना म्हणून फडणवीस पालकमंत्री होतील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, पाटील कोथरूडचे आमदार असल्यामुळे पुण्याच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील मंत्री या नात्याने त्यांचीही नियुक्ती पालकमंत्रिपदी होऊ शकते. 15 ऑगस्ट रोजी पुण्यातील ध्वजारोहण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, कोल्हापूरची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्याचे ठरल्यास फडणवीस पुण्यात येऊ शकतात. त्यावेळी नागपूरची जबाबदारी तेथील एखाद्या मंत्र्यांवर सोपवावी लागेल. भाजपच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगितले. चाळीस दिवसांनंतर नवीन सरकारमधील मंत्री निश्चित झाले. अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यातच पुढील आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पालकमंत्री पदासंदर्भात अद्याप पक्षांतर्गत पातळीवर फारशी चर्चा सुरू नसल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले.

Back to top button