यवतमाळ : ‘त्या’ लिपिकाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता | पुढारी

यवतमाळ : 'त्या' लिपिकाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

घाटंजी, पुढारी वृत्तसेवा : घाटंजी पंचायत समितीतील लिपीक प्रफुल्ल कोवे यांची घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी पुराव्याअभावी शनिवारी निर्दोष मुक्तता केली. आरोपी प्रफुल्ल कोवे यांची बाजू ॲड. अनंतकुमार पांडे यांनी न्यायालयात मांडली.

घाटंजी पंचायत समितीतील लिपीक प्रफुल्ल कोवे हे शिक्षण विभागात लिपिक पदावर कार्यरत होते. ते कार्यालयात असताना अंजी (नृसिंह) येथील शिक्षिका ही पगार पत्रक व सर्व्हिस बुकाची नक्कल दुरुस्ती करण्यासाठी आली होती. यावेळी आरोपी प्रफुल्ल याने सदर शिक्षिकेला उद्देशून ‘तु मला फारच आवडते, तू मला एकांतात कधी भेटणार, असे म्हणून वाईट नजरेने पाहून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले. तसेच आरोपी प्रफुल्ल हा नेहमीच त्या शिक्षिकेच्या मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न करत होता.

त्यामुळे शिक्षिकेने घाटंजी पोलीस ठाण्यात ९ जानेवारी २०१५ रोजी तक्रार नोंदवली. यावरुन आरोपी प्रफुल्ल कोवेविरुद्ध गुन्हा नोंदवून जमादार सुनिल दुबे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सॅमसंग कंपनीचा मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षांतर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी आरोपी प्रफुल्ल कोवे याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तथापि, कलम ४३७ अ नुसार आरोपीने पुढील सहा महिन्याकरीता रक्कम रुपये १५ ००० रुपयांचा जामीन कदबे न्यायालयाला सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. आरोपी प्रफुल्ल कोवेतर्फे ॲड. अनंतकुमार पांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button