चंद्रपूर : उमा नदीला महापूर; चिमूरातील चार वॉर्ड पाण्याखाली | पुढारी

चंद्रपूर : उमा नदीला महापूर; चिमूरातील चार वॉर्ड पाण्याखाली

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress
चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून गेल्या 24 तासात चिमूर तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने उमा नदीने रौद्ररूप धारण केल्याने महापूर आले आहे. तालुक्यातील शेकडों हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली असून चिमूरातील चार वॉर्डांमध्ये पाणी घुसले आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्येही पानी भरले असून वरोरा, कान्पा, नेरी मार्गे पूर्णपणे बंद झालेले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम चिमूर शहरामध्ये सुरू आहे.
आठवडाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी  नाल्यांना महापूर आलेला आहे. नदीपत्रातील पाणी बाहेर पडत असल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागील 24 तासात मुसळधार पावसाने चिमूर तालुक्याला झोडपून काढल्याने उमा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे महापुराचे पाणी थेट चिमूर शहरात घुसले आहे.  शहरातील ठक्कर, चावडी, पेट व  गोंडवार्डातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे.
  • उपजिल्हा रुग्णालयात पाणी घुसले

पाण्याची पातळी वाढतच असल्याने नागरिकांना सूरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. पूराचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांना संसारोपयोगी साहित्य वाचविण्याची चिंता वाढली आहे. या वार्डांसोबतच पूराने शहरातील उप जिल्हा रूग्णालयातही धडक दिली आहे. थेट रूग्णालयातच पाणी शिरल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चिमूर शहरातील किल्ला परिसरातील सभागृहात पूरामुळे बाधित होणा-या नागरिकांना आश्रय दिला जात आहे.

  •  शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

उमा नदीच्या पूरामुळे तालुक्यातील छोट्या मोठ्या नाल्यांनाही पूर आल्याने शेतात पाण्याची पातळी वाढली आहे. शेकडो हेक्टरवर आतापर्यंत धान रोवणी झाली आहेत. तर खडसिंगी भिसी परिसरात शेकडों हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. ही सर्वच पिके पूराच्या पाण्याखाली आली आहेत. आठवडाभरापासून पिके पाण्याखाली असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली आहे. पूरामुळे शेतकरी पूरता हवालदिल झालेला आहे.
  • चिमर-वरोरा, नेरी, कान्पा मार्ग बंद

तालुक्यात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने चिमूर सोबत जोडलेले तीन मार्ग सध्या बंद झालेले आहेत. चिमूर ते वरोरा उमा नदीने रौद्ररूप धारण केलेला आहे. त्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. वरोरा चिमूर मार्गावरील उमा नदीला महापूर आलेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. चिमूर ते कान्पा, नागभीड, ब्रम्हपुरी मार्गे सुरू असलेली वाहतूक बंद झालेली आहे. मालेवाडा जवळील नाल्यावर पूर आला आहे. तर चिमूर ते नेरी मार्गाची वाहतूक नेरी जवळील उमा नदी, मोठेगाव जवळील तसेच नेरी जवळून वाहणारी उमा नदीने पूराची पातळी ओलांडल्याने मार्ग बंद झालेला आहे.
  • नेरीमधील पेठ वॉर्डात घुसले पाणी

तालुक्यातील नेरी गावाजवळून उमा नदी वाहते. या नदीला महापूर आल्याने नेरी गावात पुराचे पाणी घुसले आहे. पेठ वॉर्डात पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात येत आहे.  या परिसरात पिकांची महापुराने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

Back to top button