पुणे : कुर्‍हाडीचा धाक दाखवून लुटले; सराईतासह तिघांना बेड्या | पुढारी

पुणे : कुर्‍हाडीचा धाक दाखवून लुटले; सराईतासह तिघांना बेड्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कपडे खरेदीसाठी पुण्यात आलेल्या व्यक्तीला कुर्‍हाडीने मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम चोरून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांना फरासखाना पोलिसांनी अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या. मयूर मनोहर गायकवाड (रा. येरवडा), अनिल बळीराम वाघमारे आणि ॠषभ बाबा पिसे (दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ऋषभ पिसे हा रॅकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याबाबत विश्वनाथ अवधूत गिरी (रा. वाशिम) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरी हे कपडे खरेदी करण्यासाठी पुण्यातील बुधवार पेठेत आले असता, समोरून आलेल्या तरूणांनी त्यांना धक्का देऊन त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने चोरले. त्यानंतर कुर्‍हाडीने मारहाण करून पसार झाले. त्या वेळी फिर्यादी यांनी एका व्यक्तीला पकडून ठेवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर सहायक पोलिस फौजदार रिजवान जिनेडी आणि हवालदार प्रमोद जगताप यांनी गायकवाडला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याचे अन्य दोन साथीदारांची माहिती मिळाली. पोलिसांनी येरवडा परिसरात जाऊन दारू पित बसलेल्या वाघमारे आणि पिसे याला शिताफीने पकडून अटक केली. ही कारवाई वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक संतोष शिंदे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, अंमलदार तुषार खडके यांच्या पथकाने केली.

Back to top button