नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम, भंडारा जिल्ह्यात मंदिरात अडकलेल्या भाविकांची सुटका | पुढारी

नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम, भंडारा जिल्ह्यात मंदिरात अडकलेल्या भाविकांची सुटका

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले ओव्हर फ्लो झाले असून, अनेक ठिकाणी पुरामुळे अडकलेल्या नागरिकांची बचाव पथकाने सुटका केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथे नृसिंह मंदिरात अडकलेल्या सुमारे १५ भाविकांची गुरुवारी सकाळी सुखरूप सुटका करण्यात आली. वैनगंगा नदीवरून १ फूट पाणी वाहात असल्याने गोंडपिंपरी आष्टी मार्ग दोन्ही बाजूंनी बंद करून पोलिस बंदोबस्त तैनात करण्‍यात आला आहे. दरम्‍यान, पुढील तीन दिवस आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून यावेळी घराबाहेर न पडणे सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

स्कॉर्पिओतील बेपत्ता तिघांचे मृतदेह कोल्हार तिळंगी परिसरात आढळले

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील ब्राम्हणीनाला पुलावरून वाहत गेलेल्या स्कॉर्पिओतील बेपत्ता तिघांचे मृतदेह कोल्हार तिळंगी परिसरात आढळून आले.

रामटेक आणि काटोल तालुक्यात दोघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले

पुरामुळे काटोल-वरूड मार्ग बंद झाला असून रामटेक आणि काटोल तालुक्यात दोघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड मार्गासह ११ मार्ग बंद असून शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. अहेरी उपविभागातील सिरोंचा व अहेरी तालुक्यातील १७७ कुटुंबांतील २१०३ नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले आहे. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने तालुक्यातील ३०० गावांचा संपर्क बाह्य जगाशी तुटलेला आहे.

जिल्ह्यात 24 तासांमध्ये 91.90 मिलिमीटर पाऊस

नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 91.90 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 12 जुलै पर्यंत जवळपास 357 मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 मध्यम धरणे 65 टक्के भरले आहे. यापैकी तीन प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मुसळधार पावसामुळे सावनेर तालुक्यातीलच पटाका खेरी नाला या ठिकाणी एक जण वाहून गेला. नागपूर शहरानजीकच्या मानकापूर येथील साईनगर नाल्यांमध्ये 33 वर्षीय योगेश राऊत हे वाहून गेले. याशिवाय काटोल तालुक्यातील इसापूर येथील चिखली तलावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील पेठ बुधवार या ठिकाणी दत्तू मधुकर राजूरकर ( वय ३९ ) वाहून गेल्याचे वृत्त आहे. २४ तासात दहा लोकांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या पावसामुळे 13 जुलै पर्यंत विविध घटनेत २० जण मृत्युमुखी पडले आहेत. 19 जण जखमी झाले आहेत 88 पशु देखील मृत्युमुखी पडले असून 293 घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या महिन्याभरात २ हजार 399 हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले असून तातडीने मदत पोहोचविण्याचे सांगितले आहे. ज्या गावांना पुराचा तडाका बसला आहे त्या ठिकाणी नागरिकांना गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोग्य यंत्रणा देखील सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्पदंश प्रतिबंधात्मक औषधाची उपाययोजना करण्यात आली आहे. नागरिकांनी तातडीने तालुका आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा :

 

Back to top button