चंद्रपूर : तापाने फणफणणाऱ्या मुलाला घेऊन बापाने काढली पुरातून वाट | पुढारी

चंद्रपूर : तापाने फणफणणाऱ्या मुलाला घेऊन बापाने काढली पुरातून वाट

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चार-पाच दिवसांपासून संतंतधार पाऊस…सभोवती असलेल्या नदीनाल्यांना पुराचा पाणी…पोडसा गावाला पुराच्या पाण्याने बेटाचे स्वरूप…बाहेर जाण्याचे सगळे मार्ग बंद…गावाचा संपर्क तुटला…वाढणाऱ्या पुरामुळे कुटुंबाची काळजी… अशातच चिमुकला मुलगा तापाने फणफणला. काय करावे काय नाही, काही सुचेना…

मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही. नदी-नाल्यांना पूर असल्याने पोटच्या पोराला मात्र एका जिगरबाज बापाने खाद्यांवर घेतले. थेट पुरातून जिवाची पर्वा न करता मार्ग काढून दुसऱ्या गावात पोहोचले. तिथे मुलावर उपचार करवून घेतला आणि परत गावात पुरातूनच परत आला. श्यामराव पत्रूजी गिनघरे असे बापाचे नाव असून तो गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहीवासी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वर्धा, वैनगंगा नदीला पूर आला आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेले गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा हे गाव वर्धा नदीच्या काठावर वसले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पोडसा गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. गावात येण्याचे मार्ग पाण्याखाली आल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. अशातच काल बुधवारी पोडसा येथील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा कार्तिक याला ताप आला. ताप वाढल्याने तो फणफणत होता. एकीकडे गावाला बेटाचे स्वरूप आल्याने गावाचे बाहेर जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. गावात आरोग्य सुविधा नाही. त्यामुळे बापाची काळजी अधिकच वाढली.

पूर परिस्थितीमुळे काय करावे काय नाही? अशातच मुलगा तापाने फणफणत असल्याने वडिलांची काळजी वाढतच होती. त्याचप्रमाणे गावाला वेढणारा पूरही वाढतच होता. अखेर जिगरबाज बापाने निर्णय घेतला आणि पोटच्या पोराला कडेवर घेतले. पुराच्या पाण्यातून वाट शोधत निघाला. पोडसा गावापासून पाच ते सहा कि.मी. अंतरावर वेडगाव आहे. येथे खासगी डॉक्टर आहेत. मुलाला खांद्यावर घेऊन भर पुरातून वाट काढत श्यामराव त्या गावात पोहोचला. डॉक्टरकडे मुलावर उपचार करवून घेतला आणि आल्या त्याच वाटेने पुरातून घरी पोडसा गावी पोहोचला.

पूर-महापूर आला की सरकारकडून उपाययोजनेच्या नावावर कोट्यवधींचे खर्च केले जातो. मात्र, आपत्ती ओढावल्यास उपाययोजनांचा नेहमी सुकाळच असतो. पोडसा या गावाला प्रत्येक पुराला ही स्थिती उद्भवते. मात्र, उपाययोजनांचा सूकाळ तो सुकाळच. या घटनेने प्रशासनाच्या उपाययोजनांचे धिंडवडे तर निघालेच. पण एका बापाच्या धाडसी, जिद्दी आत्मनिर्भरतेचेही दर्शन झाले. शासन-प्रशासन यातून काय शिकवण घेतो येणारा काळच ठरविणार आहे.

हेही वाचा:

Back to top button