नगर : झेडपीच्या ‘त्या’ 59 कर्मचार्‍यांना हलवले | पुढारी

नगर : झेडपीच्या ‘त्या’ 59 कर्मचार्‍यांना हलवले

नगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि थेट विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थानांतरण प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला. काल सीईओ आशिष येरेकर यांनी एकाच विभागात पाच वर्षे आणि एकाच टेबलवर तीन वर्षे काम पाहिलेल्या 59 कर्मचार्‍यांचे वेगवेगळ्या विभागात स्थानांतरण केले आहे.

झेडपीचे स्थानांतरण हा चर्चेचा विषय बनला होता. एकाच विभागात पाच वर्षे आणि एकाच टेबलवर तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांचे स्थानांतरण करणे गरजेचे होते. या संदर्भात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगार संघटनेच्या तक्रारीवरून विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तत्पुर्वीच सामान्य प्रशासन विभागाने स्थानांतरणाचा कार्यक्रम प्रसिद्ध केला होता. तारांकित प्रश्नांनंतर या प्रक्रियेला काहीशी गती मिळाली. सीईओंनीही जिल्हाधिकारी पदाचा प्रभारी पदभार असतानाही वेळ काढून काल बुधवारी दुपारी स्थानांतरणाची प्रक्रिया राबविली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या स्थानांतरणात सहायक प्रशासन अधिकारी दोन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तीन, 16 वरिष्ठ सहायक आणि 38 कनिष्ठ सहायक अशा वर्ग 3 च्या 59 कर्मचार्‍यांचे स्थानांतरण करण्यात आले, तर बांधकाम विभागात नेमके कोणाचे स्थानांतरण झाले, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही.

अर्थ विभागाचे स्थानांतरण गुलदस्त्यात !

सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत मुख्यालयातील 59 कर्मचार्‍यांचे अन्य विभागात स्थानांतरण करण्यात आले. मात्र, अर्थ विभागातील स्थानांतरण सीईओंनी का केले नाही, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, अर्थ विभागातील स्थानांतरण का झाले नाही, यावरून कर्मचारी वर्तुळातही वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचे कानावर आले.

Back to top button