चंद्रपुरात जादुटोणा, भानामती संशयातून एकाच कुटुंबातील ७ जणांना मारहाण | पुढारी

चंद्रपुरात जादुटोणा, भानामती संशयातून एकाच कुटुंबातील ७ जणांना मारहाण

चंद्रपूर ; पुढारी वृत्‍तसेवा : चंद्रपुरात जादुटोणा भानामती : जिवती तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून काही गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून, पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

चंद्रपुरात जादुटोणा भानामती ची ही घटना माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. या घटने मध्ये शांताबाई भगवान कांबळे (५३), साहेबराव एकनाथ हुके (४८), धम्मशिला सुधाकर हूके (३८), पंचफुला शिवराज हुके (५५), प्रयागबाई एकनाथ हे जबर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केले असले तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे दोन दिवस उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झाली नाही. किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कुणाला अटक करण्यात आली का, याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला.

गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे. गावातील लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली.

वृद्ध, महिलांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूक दर्शक बनले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. मारहाण झालेले कुटुंब दलित असले तरी मारहाण करणाऱ्यांमध्ये सर्वजातीय सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण…

वणी खुर्द या गावात एका कुटुंबावर जादुटोणा करत असल्याबाबत संशय होता. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसानी जाऊन त्यांना सोडविले. या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

– सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर

काही नागरिकांवर गुन्हे दाखल, कारवाई सुरू

शनिवारी वणी येथे ही घटना घडल्यानंतर लगेच त्या गावात शांततेबाबत बैठक घेण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष दिले जात आहे. काही नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
– संतोष अंबिके, सहायक पोलीस निरीक्षक, जिवती

Back to top button