पुणे; पांडुरंग सांडभोर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाल्यास त्याचा सर्वाधिक जास्त फायदा सत्ताधारी भाजपलाच होणार आहे. मतांची विभाजणी टाळून महाविकास आघाडीला टक्कर देऊन पालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी भाजपला मनसे बरोबरची युती आवश्यक ठरणार आहे. मात्र मनसेच्या हाती फारसं काही पडणार नसल्याने युतीचा फायदा मनसेपेक्षा भाजपलाच अधिक होणार असल्याचे चित्र आहे.
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. मात्र, सध्या या दोन्ही पक्षांनी सावध पवित्रा घेतला असून युतीबाबत जाहीर भाष्य करणे टाळले आहे.
भविष्यात मात्र, या दोन पक्षात युती झाल्यास त्याचा नक्की कोणाला कसा आणि किती फायदा होईल हे गत महापालिका निवडणुकीत दोन पक्षांना मिळालेल्या जागा, दुसऱ्या क्रमांकाची मते आणि मतांची टक्केवारी याचे विश्लेषण केले असता ही युती भाजपसाठी अधिक फायद्याची ठरेल असे चित्र सध्या दिसत आहे.
गत महापालिका निवडणुकित भाजपने दिडशेहून अधिक जागा तर मनसेने जवळपास 115 जागा लढविल्या होत्या. त्यात भाजपने तब्बल 98 जागा जिंकल्या होत्या, त्यात 12 जागा या भाजप आणि मनसे यांच्या मतांच्या विभाजनामुळे भाजपला गमवाव्या लागल्या होत्या. मनसे बरोबर युती असती तर भाजप 110 जागांच्या पुढे गेली असते असे मागील निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते.
तसेच या दोन्ही पक्षांना मानणारा वर्ग एकच आहे. प्रामुख्याने कोथरूड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघात तर याच दोन पक्षांचे प्राबल्य असून पालिका निवडणुकीतही याच दोन उमेदवारांमध्ये या मतदारसंघात लढती झाल्या होत्या. त्यामुळे युती झाल्यास मतांची विभाजनी टळेल. त्याचा फायदा प्रामुख्याने भाजपला होईल.
आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात भाजपने केलेल्या एका अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपला ७५ ते ८० जागा मिळतील असे समोर आले आहे. थोडक्यात भाजप बहुमताच्या जवळ पोहोचणार असल्याचे हा सर्व्हे सांगतो. त्यामुळे भाजपला सत्तेसाठी बहुमताचा आकडा पार ८ ते १० जागा लागतील त्या मनसेची मदत मिळाल्यास अधिक सोप्या पद्धतीने मिळविता येऊ शकतील.
भाजपबरोबरच युती झाल्यास मनसेलाही थोड्या प्रमाणात फायदा होणार असला तरी मनसेची झोळीत फारसं काही पडणार नसल्याचे चित्र आहे. भाजपचे सध्या ९९ नगरसेवक आहेत. तर ५१ जागेवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे १५० जागांवर थेट भाजपचा नैसर्गिक दावा असेल. विशेष म्हणजे मनसेचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले तर ८ ठिकाणी मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.
मात्र यासर्व जागांवर भाजप पाहिल्या क्रमांकावर आहे, त्यामुळे साहजिकच त्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागाही मनसेला मिळणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे कोथरूड आणि कसब्यात ज्या ठिकाणी मनसेचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि ते पालिका निवडणुकीत उतरू शकतात अशा सर्वच जागा भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या सर्व जागा वाटपाचा तिढा कसा सोडविणार असा प्रमुख प्रश्न आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपला 36. 67 टक्के इतकी मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकवरील राष्ट्रवादी काँग्रेसला 21. 94 टक्के, काँग्रेसला 8.63 टक्के, मनसेला 4.44 टक्के मते मिळाली होती.
या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्यांच्या मतांची टक्केवारी 44. 76 टक्के इतकी होते तर भाजप व मनसे एकत्र आल्यास त्यांच्या मतांची बेरीज 43.11 टक्के इतकी होते. त्यामुळे महाविकास आघाडीला भाजप- मनसे एकत्र येऊन आव्हान देऊ शकते. त्यातच काँग्रेस स्वबळावर लढल्यास या संभाव्य युतीसाठी आणखी जमेची बाब होणार आहे.