नागपुरात युवासेनेने फाडले एकनाथ शिंदेंचे बॅनर | पुढारी

नागपुरात युवासेनेने फाडले एकनाथ शिंदेंचे बॅनर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतून बंडखोरी करीत बाहेर पडलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या विषयी शिवसेनेत तीव्र रोष निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेना दुभंगण्याच्या मार्गावर आहे. तर सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांच्या विषयी असलेल्या रोषाचे पडसाद शनिवारी नागपुरातही उमटले आहे. नागपूरसह विदर्भात शिंदे यांचे समर्थक नसतानाही येथील मध्य नागपुरातील गांधी पुतळा चौकात एकनाथ शिंदे समर्थनात एक बॅनर लावण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळनंतर हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या नंतर शनिवारी नागपूर शहर युवासेनेतर्फे ज़िल्हा युवासेना प्रमुख विक्रम राठोड यांच्या नेतृत्वात हे बॅनर फाडण्यात आले. शिंदे यांच्या समर्थनार्थ नागपुरात कोणी, कुठेही बॅनर लावल्यास ते फाडण्यात येईल, असा इशारा राठोड यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडात विदर्भातील आमदारही सहभागी झालेले आहे. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यवतमाळचे संजय राठोड हेही गुवाहाटीत आहेत. आमदार शिंदेंसोबत असले तरी पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे तसेच किशोर कुमेरीया, ग्रामीणचे जिल्हा प्रमुख वसंत इटकेलवार व राजू हरणे हे ठाकरे यांच्यासोबत आहेत. शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत हे उपस्थित होते.

शिंदे यांच्या बंडाचे नागपूरसह विदर्भात फारसे पडसाद उमटलेले नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात बंडखोरांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, दगडफेक करण्यात आली. सुदैवाने तसे प्रकार अजून नागपुरात घडलेले नाही. फक्त शनिवारी शिंदे समर्थकाने लावलेले बॅनर फाडण्यात आले. यवतमाळचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या कार्यालयाला सुरक्षा देण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रवीण बरडे, धीरज फंदी, मनोज शाहु, संजय कसोधन, वसंत डोंगरे, प्रफुल तांडीए, छगन सोनवाने, निलेश सतीबावणे, बाबा लरोकर, शांतनु शिर्के आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Back to top button