Anant Geete : शिवसेनेच्या गळ्याला नखे मारण्याचे काम करू नये : अनंत गीते  | पुढारी

Anant Geete : शिवसेनेच्या गळ्याला नखे मारण्याचे काम करू नये : अनंत गीते 

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : भाजपने राजकारण करणे थांबवावे; शिवसेनेच्या गळ्याला नखे मारण्याचे काम त्यांनी करू नये, तर शिवसेना ही महाराष्ट्राची गरज नाही, हिंदू राष्ट्राची गरज आहे, देशाची गरज आहे, त्यामुळे कोणीही गद्दारी केली तरी शिवसेना डगमळणार नाही. एकसंघ होऊन पुन्हा उभारी घेईल, असे प्रतिपादन माजी मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी आज (दि.२५) खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्हा पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

यावेळी गीते (Anant Geete) म्हणाले की, शिवसेनेशी बेईमानी खपवून घेतली जाणार नाही. शिवसैनिकांच्या जीवावर तुम्ही आमदार झाले आहात, गद्दारी करून तुम्ही त्यांचा अपमान केला आहे. या पुढे कुठल्याही पक्षातून तुम्ही निवडणूक लढवा, आमचे बहाद्दूर शिवसैनिक तुम्हाला मातीत गाढल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्‍हणाले.

खा. श्रीरंग बारणे म्हणाले की, या गद्दारांना वेशीवरच अडवण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. या पुढची निवडणूक ही आव्हानात्मक निवडणूक असणार आहे. त्यामुळे कोणीही बेईमानी न करता एकनिष्ठ राहून पक्षप्रमुख जो उमेदवार देतील, त्याला निवडून आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे आत्ता आपण इर्षेने व ताकदीने उतरायचं आहे. जिल्हासंपर्क प्रमुख बबन पाटील म्हणाले की, मातोश्री हे आम्हा शिवसैनिकांचे मंदिर आहे. तर ठाकरे कुटुंबीय हे आमचे दैवत आहे. त्यांनी आम्हाला घडवले  आहे. गद्दारांना, जिल्ह्यात माफी नाही,  असे त्यांनी सांगितले.

आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर म्हणाले की, एकत्रित येऊन हा लढा आपल्याला लढायचा आहे. तसेच शिवसेना मजबूत करण्याचे काम तुमच्या साथीने करायचे  आहे, गेले त्यांचा विचार करण्यापेक्षा एकत्रितपणे काम करून शिवसेनेला पुन्हा उभारी द्यायची आहे.

या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, जिल्हासंपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हासंपर्क प्रमुख विलास चावरी, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख अनिल नवघणे, महिला आघाडी जिल्हा संघटिका रेखा ठाकरे, जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश राहाळकर, युवासेना जिल्हा विस्तारक ओंकार चव्हाण, युवासेना जिल्हाधिकारी मयुरेश जोशी, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button