मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजपने युतीमध्ये दिलेला शद्ब पाळला नाही. अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री, असा युतीमध्ये करार झाला होता. त्यावेळी भाजपने शद्ब पाळला असता तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे झाले असते आणि हेच उद्धव ठाकरे यांच्या मनात होते; मग शद्ब न पाळून एकनाथ शिंदे यांना भाजपनेच रोखले हाेते. आज हेच एकनाथ शिंदे ज्यांनी दगाफटका केला त्यांच्याकडे गेले आहेत, असे संजय राऊत यांनी आज सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत म्हणाले की, शिवसेना-भाजप युतीचा करार ठरला होता की, अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. हा करार हा शद्ब भाजपने पाळला नाही. भाजपला शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत नव्हते. त्यामुळे युती तुटली. भाजपने शद्ब पाळला असता तर शिवसेनेचे गटनेते विधीमंडळ नेते एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. शिवसेना पक्षप्रमुख यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. आजचे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे अनाहूतपणे आले. उद्धव ठाकरे यांच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपनेच रोखलं. हे एकनाथ शिंदे यांना माहित आहे, असेही त्यांनी सांगितले.
जेव्हा युती तुटली आणि राष्टवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे ठरले तेव्हा या बंडखोरांनी तेव्हा का विरोध केला नाही, असा सवालही राऊत यांनी केला. आज बंडखाेरी करणारे आमदार त्यावेळी भाजपला सोडून आघाडी स्थापन करा, असे म्हणाले हाेते. आज त्यांना ही आघाडी अनैसर्गिक वाटू लागली आहे. जेव्हा स्थापन होत होती तेव्हा या मंडळींनी मलईदार खाते आपल्याकडे ठेऊन घेतले. आता अडीच वर्षांनंतर यांना भाजपसोबत जावे असे का वाटू लागले, असा प्रश्नही त्यांनी केला.