मुंबई लोकल प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु; काय आहेत नियम? | पुढारी

मुंबई लोकल प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु; काय आहेत नियम?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई लोकल प्रवेश प्रक्रिया : सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया बुधवार, 11 ऑगस्टपासून मुंबईतील 53 रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे. त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येणार आहे.

मुंबई लोकल प्रवेश प्रक्रिया 

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येणार आहे. सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकी नजीक 358 मदत कक्ष उघडण्यात येणार असून दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत, त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्र जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले.

शासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यास आणखी काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ऑफलाईन प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता, टप्प्या- टप्प्याने तसेच ज्यांना अधिक  आवश्यकता आहे, त्यांना प्राधान्य देवून पडताळणी पूर्ण करुन मासिक पास प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

हे ही वाचलं का?

 

Back to top button