नाशिक : कांदा दरवाढीसाठी शेतकर्‍यांचे सोशल मीडियावर कमेंट्स आंदोलन | पुढारी

नाशिक : कांदा दरवाढीसाठी शेतकर्‍यांचे सोशल मीडियावर कमेंट्स आंदोलन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
कांद्याला बाजार समितीत व नाफेडकडून उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. राज्यातील व देशातील राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष आहे. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर कमेंट आंदोलन हाती घेतले आहे.

राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओज आणि मेसेजेसजच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये कांद्याला तत्काळ 30 रुपये प्रतिकिलो भाव द्यावा, अशी मागणी करावी, असे आवाहन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेत कमेंट्स करण्याचे आंदोलन संघटनेने हाती घेतले आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वांच्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या पोस्टमध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याच्या घसरलेल्या बाजार भावात तत्काळ सुधारणा व्हावी व कांद्याला कमीत कमी 30 रुपये किलोचा दर मिळावा. कांद्याची जास्तीत जास्त निर्यात करावी, यासाठी कमेंट्सच्या माध्यमातून आवाज उठवावा. आपण केलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करावेत, असे आवाहन दिघोळे यांनी केले आहे. कांद्याचे दर वाढण्यासाठी रास्ता रोको, मोर्चे यासारखी आंदोलने सुरूच राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button