नागपूर : विदेशी चलनाऐवजी दिल्या बनावट कागदी नोटा ; नागपुरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

नागपूर : विदेशी चलनाऐवजी दिल्या बनावट कागदी नोटा ; नागपुरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपुर ; पुढारी वृत्तसेवा : संयुक्‍त अरब अमिरात देशाचे चलन असलेल्या दिनारच्या मोबदल्यात कागदाचे बंडल देऊन दोन ठकबाजांनी दोन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कामठी पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिरोज नझीर खान (वय ४२, रा. झिंगाबाई टाकळी) यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्‍यात आली.

फिरोज खासगी काम करतात. राजू ऊर्फ सुनील चरणदास गजभिये हे ओला चालक आहेत. राजू हे फिरोज यांचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर राजू यांना एक युवक भेटला. ‘माझ्याकडे आठ लाख रुपये किंमतीचे दिनार चलन आहे. ते मी दोन लाख रुपयांमध्ये देतो’, असे त्‍याने राजू यांना सांगितले. त्याने राजू यांना एक दिनार दिली. तसेच स्वत:चा मोबाइल क्रमांकही दिला. राजू यांनी ती दिनार फिरोज यांना दाखवली. फिरोज यांनी मित्रांकडून दिनारची तपासणी केली. ती खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन लाख रुपयांमध्ये दिनार खरेदीचा व्यवहार झाला.

संबंधित युवकाने राजू व फिरोज यांना कामठी येथे बोलाविले. त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. दिनार असल्याचे सांगून एक पिशवी फिरोज यांना दिली. त्यानंतर राजू व फिरोज कारने नागपूरकडे परत जायला निघाले. मध्येच फिरोज यांनी पिशवीतील दिनार बघितली, त्यात कागदाचे तुकडे होते. फिरोज व राजू यांनी लगेच जुनी कामठी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. हेडकॉन्स्टेबल दिलीप शिरसाठ यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला. मोबाइल क्रमांकाच्या आधारे पोलिस ठकबाजांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

Back to top button