वर्धा : तेंदुपत्ता आणण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार, एक महिला गंभीर जखमी | पुढारी

वर्धा : तेंदुपत्ता आणण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार, एक महिला गंभीर जखमी

वर्धा ; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील येनिदोडका शिवारातील जंगलात तेंदुपत्ता संकलनास गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली. मंगळवारी (दि.२४) सकाळी ही घटना घडली.

कारंजा (घाडगे) तालुक्यातील येनिदोडका येथील १० ते १२ महिला सकाळच्या सुमारास येनिदोडका जंगल शिवारात तेंदूपत्ता संकलित करण्यासाठी गेल्या होत्या. तेंदूपत्त्याच्या झाडावरून पाने तोडत असताना अचानक पट्टेदार वाघाने महिलावर हल्ला चढविला. यामध्ये सुशीला भाऊराव मंडारी (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. दरम्यान, वाघाने सोबत असलेल्या महिलेवरसुद्धा हल्ला केला. यात अविता रवींद्र मंडारी (वय २७) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी सहायक उपवनसंरक्षक डॉ. स्वामी, कारंजाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर, कारंजा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बबन मोहंदूळे, प्रवीण चौरे, निलेश मुंडे, उमेश खामनकर, कोमल वानखडे, वनविभागाचे कर्मचारी पुरूषोत्तम कडसाईत आदी दाखल झाले होते. तेंदूपत्ता संकलित करण्याचा मंगळवार हा अखेरचा दिवस होता. त्यामुळे महिला सकाळीच तेंदूपत्ता तोडण्याकरिता जंगलाच्या दिशेने गेल्या होत्या. दरम्यान ही घटना घडली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button