लोणावळ्यातून हरवलेल्या दिल्लीतील अभियंत्याचा अखेर मृतदेह सापडला | पुढारी

लोणावळ्यातून हरवलेल्या दिल्लीतील अभियंत्याचा अखेर मृतदेह सापडला

लोणावळा; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथील एक अभियंता लोणावळ्यात गिरीभ्रमंतीसाठी आला असता ड्युक्स नोज परिसरातून शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून मागील सलग पाच दिवस त्याचा विविध पद्घतीने शोध सुरु होता. अखेर लोणावळा पोलीस, आयएनएस शिवाजी, एनडीआरएफ, लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र, खोपोली येथील यशवंती हायकर्स आणि वन्य जीव रक्षक, मावळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने त्यांचा मृतदेह ड्युक्स नोज परिसरातील जंगलात आढळून आला. फरहान अहमद सेराज्जूद्दीन असे या हरविलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

याबबातची अधिक माहिती अशी की, फरहान हा काही शासकीय कामासाठी कोल्हापूरला गेला होता. एका रोबोट बनविण्याच्या कंपनीत तो काम करत होता. तसेच त्याला गिर्यारोहणाचा आवड असल्याने कोल्हापूर व पुणे येथील काम उरकल्यानंतर तो लोणावळ्यातील ड्युक्स या ठिकाणी फिरायला गेला होता. यानंतर तो तसर्या चुकला. आपण रस्ता चुकलो असून भरकटल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने भावाला फोन करून ही माहिती सांगितली. त्यानंतर काही वेळात त्याचा मोबाईल बंद झाला होता.

फरहानच्या भावाने काही मित्रांच्या मदतीने लोणावळा पोलिसांशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून तो गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकातील स्वंयसेवक, खोपोली येथील यशवंती हायकर्स सदस्य व कुरवंडे गावातील तरुण त्याचा शोध घेत होते. दोन दिवस पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने देखील शोध मोहिम राबवली. त्यानंतर आयएनएस शिवाजी, एनडीआरएफचे पथक या शोधमोहिमेत सहभागी झाले.

उंच डोंगर व दर्‍या त्यामध्ये घनदाट झाडी असा परिसर असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत असल्याने सर्व पथके गेली चार दिवस सातत्यपूर्ण प्रयत्न करत होती. मात्र, त्याचा शोध लागत नव्हता. सोमवारी चौथ्या दिवशी त्याच्या नातेवाईकांकडून सदर युवकाचा शोध घेणार्‍यास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले. अखेर आज मंगळवारी सकाळीच्या वेळेत आयएनएस शिवाजीच्या शोध पथकाला ड्युक्स नोजच्या पायथ्यापासून खाली ३५० फूट खोल दरीत फरहान अहमद सेराज्जूद्दीन हा मृतावस्थेत मिळून आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button