नागपूर : सायबर गुन्हेगारांचा महिला न्यायाधीशांना गंडा, फास्ट टॅग रिचार्ज करताना पाऊणे तीन लाख रुपये लंपास | पुढारी

नागपूर : सायबर गुन्हेगारांचा महिला न्यायाधीशांना गंडा, फास्ट टॅग रिचार्ज करताना पाऊणे तीन लाख रुपये लंपास

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या एका महिला न्यायाधीशांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी पाऊणे तीन लाख रुपए गायब केले. महिला न्यायाधीशांनी फास्ट टॅग रिचार्ज करण्यासाठी गुगलवर लिंक शोधून रिचार्ज करण्याचा प्रयत्न केले असता हा प्रकार घडला. या प्रकरणी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगार ऑनलाईन फ्रॉड करुन अनेकांच्या खिशाला चाप बसवत असतात. यातील हा नवा प्रकार आज उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्र न्यायालयातील एका महिला न्यायाधीशांनी दोन दिवसांपूर्वी आपल्‍या कारचे फास्ट टॅग रिचार्ज करण्यासाठी गुगलवरील लिंक सर्च केले. त्यावर आपले बँक खात्याचे डिटेल टाकले. त्यांचे फास्ट टॅग रिचार्ज झाले. त्यानंतर त्यांनी आपले बँक खाते नेटबँकिंगच्या माध्यमातून तपासले असता त्या बँक खात्यातून २ लाख ७५ हजार ३९९ रुपये अज्ञात खात्यात वळते झाल्याचे लक्षात आले. त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला फोनकरुन माहिती दिली. तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली.

पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या कलम ४११, ४२० आणि आयटी ॲक्टच्या कलम ६६(सी ) आणि ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सायबर सेलच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून तपास सुरु आहे. मात्र आतापर्यंत पोलिसांच्या हाती गुन्हेगारांबद्दल ठोस माहिती लागलेली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button